चंद्रपूर : राज्य शासनाच्या सूचनेनुसार १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या जिल्हास्तरीय उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते आदिवासी विकास विभागाच्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. यावेळी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार उपस्थित होते.
आदिवासी समाजासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना उपलब्ध आहेत. मात्र अनेकदा योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने त्यांना अपेक्षित लाभ मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून आदिवासी बहुल गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
या अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाद्वारे जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील आदिवासी बहुल गावांमध्ये विविध योजनांची माहिती प्रदर्शित केली जाणार आहे. चित्ररथाच्या माध्यमातून नागरिकांना योजनांची पात्रता, उपलब्ध सुविधा आणि शासनाकडून दिल्या जाणाऱ्या विविध लाभांची माहिती सहजपणे मिळणार आहे.
यामध्ये शासकीय आश्रमशाळा समूह योजना, अनुदानित आश्रमशाळा, शबरी आदिवासी घरकुल योजना, आदिवासी मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहे, विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश, महाराष्ट्र टायबल पब्लिक स्कूल सोसायटीच्या एकलव्य मॉडेल निवासी शाळा, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना आणि परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनांची माहिती दिली जाणार आहे.
तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना, कन्यादान योजना, सबळीकरण व स्वाभिमान योजना, राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अबुल कलाम अमृत आहार योजना यांसह आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे.
अभियानाच्या माध्यमातून दुर्गम व आदिवासी बहुल भागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या योजनांची माहिती थेट पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार असून, पात्र लाभार्थ्यांनी उपलब्ध योजनांचा लाभ घ्यावा, यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.
यावेळी आदिवासी विकास विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी प्रेम राठोड, राजीव बोंगिरवार, सुधाकर गौरकर, राजेश धोटकर, सचिन आष्टुनकर, अमोल नवलकर, युवराज चव्हाण, प्रिया मून, तेजश्री चवरे, ज्ञानेश्वर गावंडे, डी.एम. कुडसंगे, प्रफुल धात्रक, ज्ञानेश्वर गोपी, प्रितम मडावी आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.













