बल्लारपूर (जि. चंद्रपूर) : कारवा-जुनोना मार्गावरील बांबू डेपो परिसरात मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघातात एका मजुराचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. भरधाव वेगाने आलेली कार थेट झोपडीत घुसल्याने ही दुर्घटना घडली.
मृतकाचे नाव देवलाल शामलाल पंधरे (वय ५५, रा. चारगाव, जि. मंडला, मध्यप्रदेश)*असे असून, ते मजुरीसाठी येथे आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गोरेलाल धनसिंग पंधरे (वय ३५) यांच्यासह सुमारे २४ मजूर ठेकेदार आनंद धुर्वे यांच्या माध्यमातून पोंभुर्णा परिसरात बांबू कापणीच्या कामासाठी महिनाभरापूर्वी आले होते. १ मे रोजी मजुरीचे पैसे घेण्यासाठी सर्व मजूर चंद्रपूरजवळील बंगाली कॅम्प परिसरात गेले असता, ठेकेदाराने पैसे देण्यास नकार दिल्याची बाब समोर आली आहे. त्यानंतर सर्वांना कारवा रोडवरील जुनोना डेपो परिसरात दोन दिवस थांबण्यास सांगण्यात आले होते.
दरम्यान, २ मे रोजी पहाटे सुमारे २.३० वाजता सर्व मजूर झोपडीबाहेर झोपलेले असताना एमएच-४९ सीएस-६८४४ क्रमांकाची काळ्या रंगाची सॉनेट कार भरधाव वेगाने येऊन झोपडीवर आदळली. या धडकेत झोपडीची भिंत कोसळून देवलाल पंधरे यांच्या अंगावर मलबा पडला. इतर मजूर घाबरून पळून गेले, मात्र देवलाल मलब्याखाली अडकले.
घटनास्थळी उपस्थित मजुरांनी तातडीने मलबा हटवून त्यांना बाहेर काढले आणि रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी कार चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेमुळे मजुरांच्या निवाऱ्याची व सुरक्षिततेची गंभीर समस्या पुन्हा समोर आली आहे. ठेकेदाराकडून मजुरी न देणे आणि मजुरांना असुरक्षित ठिकाणी थांबविणे, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.













