गोंडपिपरी (सुरज माडूरवार)
गोंडपिपरी तालुक्यातील वढोली बसस्थानक परिसरात सोमवारी (दि. 20) दुपारी सुमारे 1 वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
MH 34 CJ 7999 क्रमांकाच्या भरधाव कारने वढोली येथील रामा विठोबा बुटले (वय 55) या पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. ही कार येथील उद्योजक अनिल सुरकर यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली आहे. या धडकेत रामा बुटले गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचारासाठी नेत असताना बल्लारपूरजवळ दुपारी सुमारे 3 वाजताच्या सुमारास त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेमुळे वढोली परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. मृतक रामा बुटले यांच्या पश्चात आई व दोन भाऊ असा आप्तपरिवार आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.













