महाराष्ट्रभर सर्वच राजकीय नेत्यांकडून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त राज्यभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांनी गर्दी करत आपल्या क्रांती सुर्याला अभिवादन केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज राज्यभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मध्यरात्रीपासूनच भीम अनुयायांनी ‘जय भीम’च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून सोडले. मुंबई चैत्यभूमी आणि दीक्षाभूमी येथे लाखो अनुयायांनी गर्दी करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे, पुस्तक प्रदर्शन, विचार जागृती कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले तसेच मुंबईत महापालिकेच्या वतीने बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. बाबासाहेबांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला दिलेल्या दिशेचा उल्लेख करत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. राज्यातील विविध शहरांमध्येही अनोख्या पद्धतीने ढोल ताशे फटाक्यांच्या जल्लोषात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात केवळ उत्सव नव्हे, तर त्यांच्या समता, न्याय आणि बंधुत्वाच्या विचारांची आठवण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे चित्र पाहायला मिळालं.
तसेच दरवर्षीप्रमाणे दादर येथील चैत्यभूमीला आंबेडकरांचे अनुयायी भेट देत असतात, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारक, ‘राजगृह’ निवासस्थान आणि संबंधित परिसरांमध्ये विविध प्रकारच्या नागरी सेवा-सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती.













