भामरागड : तालुक्यातील मूलभूत सुविधांच्या अभावाविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) तर्फे तहसील कार्यालय परिसरात बुधवारी (दि. १५ एप्रिल २०२६) पासून बेमुदत लक्षवेधी धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली. नेलगुंडा ग्रामपंचायत अंतर्गत भटपर या आदिवासी बहुल गावाला आजही पक्क्या रस्त्याचा अभाव असल्याने नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर आणि छत्तीसगड सीमेजवळ असलेल्या भामरागड तालुक्यात स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांहून अधिक काळ लोटूनही अनेक गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. भामरागड मुख्यालयापासून सुमारे २० ते २५ किमी अंतरावर असलेल्या भटपर गावात ५८१ लोकसंख्या असून १२० कुटुंबे वास्तव्यास आहेत. मात्र, या गावाला जाण्यासाठी कोणताही पक्का रस्ता नसून फक्त पायवाटेवरूनच प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात अनेक नदी-नाले ओलांडावे लागतात, पण त्यावर पूलही नसल्याने नागरिकांचे हाल अधिकच वाढतात.
या पार्श्वभूमीवर भाकपाने भटपर ते दर्भा आणि भटपर ते घोटपाडी या मार्गांचे पक्के रस्ते बांधकाम, आरोग्य व शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा सुरू करण्याच्या मागण्या केल्या आहेत. यासंदर्भात जानेवारी २०२६ मध्ये तहसील कार्यालयाला निवेदन देऊन १५ एप्रिलपासून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मागण्यांची पूर्तता न झाल्याने अखेर आजपासून आंदोलनाला सुरुवात झाली.
आंदोलन सुरू झाल्यानंतर काही तासांतच उपविभागीय अभियंता (बांधकाम) एस. एम. दुर्गे यांनी तहसील कार्यालय गाठले. तहसीलदार किशोर बागडे यांनी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावून घेतले. यावेळी रस्त्याच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित रस्त्याच्या कामासाठी सुमारे ४ कोटी रुपयांची आवश्यकता असून नवीन आर्थिक वर्षात निधीची तरतूद करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रत्यक्ष कामाला जुलै-ऑगस्टपर्यंत सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, पावसाळ्यापूर्वी तात्पुरती उपाययोजना करून रस्ता सुकर करण्याची मागणी शिष्टमंडळाने लावून धरली. यावर उपविभागीय अभियंता दुर्गे यांनी कार्यकारी अभियंता सरदार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. तसेच शिष्टमंडळाला गडचिरोली येथे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासनही देण्यात आले.
तहसीलदारांनी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या अहेरी आगारातील अधिकाऱ्यांनाही चर्चेसाठी बोलावले. भटपर मार्गाचा सर्वेक्षण करण्यासाठी उद्या सकाळी एस.टी. बस पाठविण्यात येणार असून मार्ग योग्य असल्यास त्वरित बससेवा सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले.
दरम्यान, आंदोलनस्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रशासन या मागण्यांकडे किती गांभीर्याने पाहते आणि त्या कधी पूर्ण होतात, याकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.
या आंदोलनात भाकपाचे जिल्हा सहसचिव सचिन मोतकुरवार, जिल्हा सदस्य सुरज जक्कुलवार यांच्यासह भटपर गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.













