गडचिरोली : गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील तळोधी येथे रविवारी सायंकाळी भीषण अपघात घडून चार जणांचा मृत्यू तर ११ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देत जखमींची विचारपूस केली व उपचाराबाबत महत्त्वाचे निर्देश दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, कुरुल-रामपूर येथून भाडभीडी (मो.) येथे लग्नासाठी निघालेल्या स्कॉर्पिओ (MH 46 P 5392) वाहनाची गडचिरोलीकडून येणाऱ्या प्रवीण टुर्स अँड ट्रॅव्हल्स (MH 15 CK 5005) या वाहनाशी तळोधी येथील नवीन पेट्रोल पंपाजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की स्कॉर्पिओमधील अनिकेत बर्लावार (वय २६, रा. भाडभीडी), आरोही मोगरकर (वय ८, रा. गट्टेगुडा), सुमन गव्हारे (वय ६०, रा. कुणघाडा) आणि विमलाबाई गव्हारे (वय ६०, रा. कुणघाडा) यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर प्रवासी गंभीर जखमी झाले.
या अपघातात गुरुदेव कुणघाडकर (वय ६०, रा. भाडभीडी), सुधाकर कुणघाडकर (वय ६०, रा. भाडभीडी), वेदांत वैरागडे (वय २२, रा. भाडभीडी), प्रतिमा मानमुडकर (वय ३५, रा. गिलगाव), निखिल दराडे (वय १७, रा. भाडभीडी), संजय वैरागडे (वय १७, रा. भाडभीडी), कुणाल कन्नाके (वय २१, रा. भाडभीडी), रेखा चलाख (वय ५५, रा. जुनोना), अमर चलाख (वय ५७, रा. जुनोना), देवाजी गव्हारे (वय ५५, रा. कुणघाडा) आणि गुरूदास वासेकर (वय ६०, रा. भिवापूर) हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी जखमींची विचारपूस करून डॉक्टरांशी चर्चा केली. उपचारात कोणतीही कुचराई होऊ नये, आवश्यक औषधे, मनुष्यबळ व वैद्यकीय सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. तसेच जखमींच्या नातेवाईकांना आवश्यक ती मदत करण्याबाबत प्रशासनाला सूचना केल्या.
यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश व गोकुल तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे उपस्थित होते. अधिकाऱ्यांनीही उपचार व्यवस्थेचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या.
अपघातानंतर जखमींना तळोधी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे.













