कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात एका तरुणाने रेल्वेच्या विद्युत खांबावर चढून केलेल्या धोकादायक कृत्यामुळे दुपारच्या सुमारास मोठी खळबळ उडाली. या प्रकारामुळे फलाट क्रमांक 1, 1(a), 2, 3 व 4 वरील रेल्वे सेवा सुमारे दीड ते दोन तास पूर्णपणे ठप्प झाली. संबंधित तरुणाला वीजेचा धक्का बसून तो खाली पडल्याने गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास हा तरुण रेल्वेच्या विद्युत खांबावर चढला. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तो एका खांबावरून दुसऱ्या खांबावर फिरत राहिला. परिस्थिती गंभीर होत असल्याने रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून काही फलाटांवरील वीजपुरवठा बंद केला.
दरम्यान, संबंधित तरुणाने पोलिसांकडे मोबाईल फोनची मागणी केली होती. त्याला फोन देण्यात आल्यानंतर काही वेळाने त्याने तो खाली फेकून दिला. त्याचदरम्यान त्याला करंट लागल्याने तो खाली कोसळला. या घटनेमुळे स्थानकावर मोठी गर्दी झाली होती.
या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसून त्याने असे कृत्य का केले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.













