आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पहिला पुजेचा मान हा अर्थातच शिवपार्वती पुत्र श्री गणरायाचा आहे. कोणतेही कार्य असो आपण गणपतीची पुजा, आराधना प्रथम करतो. हा सर्वांचा विघ्नहर्ता आहे त्यामुळे आपल्या कार्यामधील प्रत्येक विघ्न तो दूर करतो अशी मान्यता आहे.
गणपतीचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत. या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस पुढीलप्रमाणे मानले जातात. पहिला वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जन्मदिवस. दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच श्रीगणेश चतुर्थीचा दिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे श्रीगणेश जयंतीचा दिवस असतो.
भाद्रपद चतुर्थीला गणेशाचे पार्थिव पूजन केले जाते, तर माघी चतुर्थीला अर्थातच गणेश जयंतीला गणेशाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. परंतु लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी पार्थिव गणेशाच्या पूजेला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिल्यापासून भाद्रपद चतुर्थीला अधिक महत्त्व प्राप्त झाले. तसे असले, तरी आजही अनेक ठिकाणी माघी गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात आनंदात साजरा केला जातो.
माघ शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते. या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानण्यात येते. गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी सुध्दा म्हणतात. षोडशोपचार गणेशपूजन करून तिळमिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात म्हणून या चतुर्थीला ‘ तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात. काही ठिकाणी गणेश चतुर्थी प्रमाणे दीड ते पाच दिवस गणेश जयंती साजरी करण्यात येते. गणेश जयंती हा गणेश जन्मोत्सव आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी हे खरेतर व्रत आहे.
अंगद देशात रुद्रकेतू नावाचा विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याला शारदा नावाची सुविद्य आणि सुशिल पत्नी होती. त्यांचा संसार सुखात सुरू होता, परंतु संतानप्राप्तीच्या सुखापासून ते वंचित होते. त्यांनी देवाची करुणा भाकली. नियतीने त्यांच्या पदरी एक सोडून दोन पूत्रांचे दान दिले़ जुळ्या मुलांचे नामकरण झाले, देवांतक आणि नरांतक.
ही मुले मोठी होऊ लागली. महर्षी नारद त्यांच्या भेटीला आले. त्यांनी मुलांचे भाकित वर्तवले. ते रुद्रकेतूला म्हणाले, ‘तुमच्या पोटी जन्मलेली ही दोन्ही महापराक्रमी होतील. परंतु, त्यांनी त्यांच्या शक्तीचा गैरवापर करता कामा नये, अन्यथा त्यांचा विनाश होईल. त्यांना सद्बुद्धी लाभावी, म्हणून देवाधिदेव महादेव यांची उपासना करायला सांगा.’
त्यानुसार दोघेही महादेवाची उपासना करू लागले. त्या निरागस बालकांची भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले. त्यांनी वर मागायला सांगितला. साक्षात देव प्रसन्न झालेत पाहून दोघांची मती फिरली. ते म्हणाले, ‘आम्हाला अमरत्व द्या.’ भगवान म्हणाले, ‘मृत्यूलोकात जन्माला आलेल्यांना मरण हे येणारच. अमरत्त्वाचा आशीर्वाद मी देऊ शकत नाही. दुसरे काही हवे असेल, तर मागा.’ मुले हुशाह होती. ती म्हणाली, ‘देवा, आम्हाला आमच्या नावानुसार देवावर आणि मानवावर विजय मिळवायचा आहे. त्रैलोक्यीचा राज्यकारभार चालवायचा आहे. जगावर सत्ता मिळवायची आहे.’ लहान मुलांची मोठी स्वप्ने पाहून देव तथास्तू म्हणाले आणि अंतर्धान पावले.
साक्षात महादेवांचा आशीर्वाद मिळाल्यापासून दोघेही उन्मत्त झाली. सत्शील दांपत्याच्या उदरी पापबुद्धीची बालके कशी जन्माला आली, याचे सर्वांना आश्चर्य वाटू लागले. तोवर या बालकांनी समविचारी, पराक्रमी, दुष्ट वृत्तीची फौज तयार केली आणि स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ लोकावर अतिक्रमण केले. त्यांनी लोकांचा अतोनात छळ सुरू केला. लोकच नव्हे तर देवही त्यांच्या भीतीने चळचळा कापू लागले. ते महादेवांना शरण आले. परंतु, या मुलांना महादेवांनीच आशीर्वाद दिला म्हटल्यावर त्यांचा नाईलाज झाला. म्हणून त्रिदेव, समस्त ऋषी आणि देवगणासह गणरायाला शरण केले. त्यानेच आपल्या चतुर बुद्धीने यातून मार्ग काढावा, अशी प्रार्थना केली.
देवांतक आणि नरांतकाला देव, दानव आणि मानव यांच्यापासून अभय होते. म्हणून गणरायाने मानवी देह आणि हत्तीचे शीर धारण करून महापुण्यवान कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी, देवमाता अदिती हिच्या उदरी जन्म घेईन असा शब्द दिला.
महर्षी नारदांनी ही वार्ता कश्यप ऋषींना जाऊन सांगितली. त्रिभुवनपालक गणपती आपल्या घरात जन्म घेणार या विचाराने दोघेही आनंदून गेले. त्यांनी गणरायाची आराधना सुरू केली. अदिती माता गर्भवती राहिली. नवमास पूर्ण झाले आणि माघ शुक्ल चतुर्दशीला दुपारच्या वेळी अदिती मातेच्या उदरी जन्म घेतला. सर्व देवांनी गणरायाचे साजिरे गोजिरे बालरूप पाहून स्वर्गातून पुष्पवृष्टी केली. सर्व नद्या आणि देवस्त्रिया वेषांतर करून बाळाला न्हाणी घालण्यासाठी आल्या. बाळाला न्हाऊ घातले. बाळलेणी घातली. दुपट्यात गुंडाळून पाळण्यात घातले. सर्वांच्या उपस्थितीत बाळाचा नामकरण सोहळा पार पडला.
महाराष्ट्रातील अनेक कुटुंबात गणेशजयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते. गणेश जयंतीच्या दिवशी गणरायाची मूर्ती आणून तिचे पूजन केले जाते. माघी गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते. गणरायाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी आहे असे शास्त्रात सांगितले आहे.
मोदक हा बाप्पाचा आवडता नैवेद्य पण माघी गणेश जयंतीला गणपती बाप्पाला खास तिळसाखरेचे किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण केले जातात. षोडशोपचार गणेशपूजन करून तिळमिश्रित गुळाच्या लाडवाचा, मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी गणपतीबाप्पाचे विसर्जन केले जाते. या तिथीला स्नान, दान,जप व होम केल्यामुळे या विघ्नविनायकाची कृपादृष्ट सदैव आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहते असे म्हणतात.
या माघी गणेश जयंतीच्या आपल्या सर्वांना दैनिक सह्याद्रीचा राखणदार समुहा तर्फे तसेच संजीवनी बुटी परीवारा कडून हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या सगळ्यांवर त्याची कृपादृष्टी आणि आशिर्वाद सदैव राहो हीच मनापासून मनोकामना.












