गोंडपिपरी : (सुरज माडूरवार)
शहरात भाड्याच्या घरात बेकायदेशीरपणे गोवंश जातीच्या प्राण्याची कत्तल करून त्याचे मांस विक्रीसाठी साठविल्याचा गंभीर प्रकार गोंडपिपरीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून मोठ्या प्रमाणात गोमांस जप्त केले आहे.रविवारी (दि. १८) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गर्शनात करण्यात आली.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गोंडपिपरी पोलिसांनी छापा टाकला.या कारवाईत समीर रियाजुद्दीन शेख (वय ३०, रा. रवींद्रनगर, बल्लारशाह) आणि रियाजुद्दीन हफीजुद्दीन शेख (वय ६५, रा. बल्लारशाह) यांना ताब्यात घेण्यात आले. दोघेही गोंडपिपरी येथे भाड्याच्या घरात वास्तव्यास असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींनी गोवंश जातीच्या प्राण्याची कत्तल करून त्याचे मांस चोरट्या पद्धतीने विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
छाप्यात २५ किलो गोमांस जप्त करण्यात आले असून, त्याची पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, १९७६ अंतर्गत कलम ५, ५(क), ९, ९(अ), ११ तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून, या प्रकारामागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचा शोध घेतला जात आहे. गोवंश संरक्षणासंदर्भातील कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.













