गडचिरोली: शेतात शांततेने झोपलेल्या ७९ वर्षीय वयोवृद्ध शेतकरी पुसु नरंगो हबके यांच्या निर्घृण हत्येचा उलगडा नेलगुंडा पोलिसांनी केला आहे. जुन्या वैमनस्य आणि वारंवारच्या वादांमुळे रागावलेल्या दोन तरुणांनी कुऱ्हाडीने त्यांचा गळा पाडून खून केल्याची कबुली देऊन पोलिसांच्या चतुराईला ते शरण गेले. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
१० जानेवारी रोजी रात्रीच्या वेळेस मृतक पुसु नरंगो हबके व त्यांची पत्नी दसरी पुसु हबके हे शेतातील मोहाच्या झाडाखाली शेकोटीजवळ खाटेवर झोपले होते. तेवढ्यात अज्ञात इसमाने कुऱ्हाडीने पुसु नरंगो यांचा गळा कापून खून केला. फिर्यादी दसरी पुसु हबके यांनी नेलगुंडा पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर गुन्हा क्र. ०१/२०२६, कलम १०३(१) भा.न्या.संहिता-२०२३ अंतर्गत ११ जानेवारीला गुन्हा दाखल झाला.
तपास अधिकारी पोउपनि अमोल सोळुंके यांच्या नेतृत्वाखालील टीमने तात्काळ तपास सुरू केला. संशयित प्रकाश विज्या वाचामी (२३, रा. नेलगुंडा) आणि दीपक दोगे वड्डे (२४, रा. नेलगुंडा) यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. त्यांनी सांगितले, “जुन्या वैमनस्यातून आणि अधूनमधून होणाऱ्या वादांमुळे रागाच्या भरात आम्ही मृतक शेतात झोपले असताना कुऱ्हाडीने गळ्यावर वार करून जिवंत नीठ मारले.”१५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता दोन्ही आरोपींना अटक करून भामरागड न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ही कारवाईत पोलिस अधीक्षक निलोत्पल, अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक आणि भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि अमोल सोळुंके यांनी पार पाडली. तर पोहवा विक्रम बुरंगे, पतिराम मडावी, पोशि ज्ञानेश्वर मडावी, प्रशांत चुधरी, बाबुराव पल्लो, गणेश शिर्गावार, हर्षल धानोरकर, अक्षय बामणवाडे (नेलगुंडा पोस्टे), पोशि संजय चव्हाण (पेनगुंडा पोमके) यांनी मोलाची भूमिका बजावली.













