गोंडपिपरी ( सुरज माडूरवार)
तालुक्यातील सोमनपल्ली येथील दाम्पत्य रविवारी (दि. २८) दुपारी चेकफुटान्यासाठी गोंडपिपरी–वढोली मार्गाने दुचाकीने निघाले असता पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आयुषी विपुल नागपुरे (वय ६) या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. धडकेत आयुषी गंभीर जखमी झाली होती. तिला आई-वडील व लहान बहिणीसह तातडीने गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच आयुषीचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. अपघातात जखमी झालेले पालक व लहान बहिणीची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले.
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त दुचाकी ताब्यात घेतली असून अज्ञात धडक देणाऱ्या वाहनचालकाचा शोध सुरू आहे. घटनेचा पुढील तपास सुरू असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाची ओळख पटविण्यासाठी मार्गावरील सीसीटीव्ही व प्रत्यक्षदर्शींची मदत घेतली जात आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरी सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
गोंडपिपरी–खेडी मार्गावर सुरजागड लोहखनिज वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वर्दळ असते.खरारपेठ व वढोली परिसरात सकाळी व रात्री सुरक्षारक्षक नेमावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.या मार्गावर अलीकडे अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे.













