गडचिरोली: राजस्थानच्या गंगानगर येथे १९ ते २३ डिसेंबर २०२५ पर्यंत भव्यतेने पार पडलेल्या १४व्या राष्ट्रीय पॅरा ज्युडो अजिंक्यपद स्पर्धामध्ये गडचिरोलीच्या लुब्धा खंडाळकरने इतिहास रचला आहे. पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालय, घोट येथील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी असलेली लुब्धा खंडाळकरने ४० किलो वजनी गटात सुवर्ण पदक आणि ४६ किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावून महाराष्ट्राचा आणि देशाचा नावलौकिक केला. ही दुहेरी पदक यश तिच्या जिद्दीने संपूर्ण देशाला प्रेरणा दिली आहे.
भामरागड तालुक्यातील साध्या कुटुंबातील लुब्धा खंडाळकर ही २०२१-२२ पासून नवोदय विद्यालय घोट येथे शिकत आहे. ही खरी ‘पॅरा योद्धा’ असून विविध खेळांना प्रेम करणारी ही १० वीची विद्यार्थिनी २०२४-२५ मध्ये पॅरा ऍथलेटिक्ससाठी निवडली गेली. नवोदय विद्यालय समिती आणि आदित्य मेहता फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हैदराबाद येथे वर्षभर प्रशिक्षण घेत तिने ज्युडो आणि आर्म रेसलिंगमध्ये कमाल केली. विशेष म्हणजे,याच वर्षी मे महिन्यात दिल्लीतील एशियन पॅरा आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप मध्ये ३५ ते ६० किलो गटात डाव्या आणि उजव्या हाताच्या स्पर्धेत तिने दोन कांस्य पदके जिंकून देशाचे प्रतिनिधित्व केले.
या स्पर्धेत देशभरातील शेकडो खेळाडूंसोबत स्पर्धा करत लुब्धाने आपली वेगळी ओळख निर्माण केली. तिच्या कठोर परिश्रमाने या आधीच तिने राष्ट्रीय पातळीवर मजल मारली होती.आता १४ व्या राष्ट्रीय पॅरा ज्युडो स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत तिने सुवर्ण आणि कांस्य पदक कमाई करून इतिहास रचला. ही कामगिरी महाराष्ट्राच्या ज्युडो खेळाडूंसाठी अभिमानाची ठरली आहे.
तिच्या या यशस्वी प्रवासात भामरागड तालुक्यात शिक्षक असलेले वडील संजय खंडाळकर,नवोदय विद्यालयाचे प्राचार्य ममता लांजेवार, उपप्राचार्य राजन गजभिये, शारीरिक शिक्षक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. स्थानिक पातळीवर कौतुकाची लाट उसळली असून पालक, शिक्षक आणि नागरिक तिच्यावर कौतुकांचा वर्षाव करत आहेत.













