गडचिरोली: निसर्गाचे वैभव, वन्यजीवांची समृद्धी आणि आदिवासी संस्कृतीची ओळख असलेल्या कमलापूर या छोट्याशा गावाने आता शैक्षणिक क्षेत्रातही आपला ठसा उमटविला आहे. ज्या गावात शिक्षणाची स्वप्ने रुजली, त्याच गावाच्या इतिहासात एका सुपुत्राने आपल्या कर्तृत्वाने अभिमानाचे नवे पान जोडले आहे. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थिती, अनेक अडचणी आणि संघर्षावर मात करत प्रा. सत्यनारायण पुसाला यांनी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून प्राणिशास्त्र विषयात पीएच.डी. (आचार्य) पदवी संपादन केली आहे. विशेष म्हणजे, कमलापूर गावातील पहिले एम.एस्सी. पदवीधर ठरण्याचा मान मिळवल्यानंतर आता गावातील पहिले डॉक्टरेटधारक होण्याचा ऐतिहासिक बहुमानही त्यांनी पटकावला आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण कमलापूर गावाची मान अभिमानाने उंचावली आहे.
डॉ. सत्यनारायण पुसाला यांच्या संशोधनाचा विषय मध्य भारतातील कॅटफिश (मत्स्य) जैवविविधता, डीएनए बारकोडिंग आणि आण्विक वंशविकास (Molecular Phylogeny) असा होता. आधुनिक आण्विक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी या विषयावर महत्त्वपूर्ण संशोधन पूर्ण केले. या संशोधनासाठी त्यांना डॉ. मंदार एस. पैगणकर यांचे मार्गदर्शन लाभले. सध्या ते शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीद्वारा संचालित मोहसीनभाई झवेरी महाविद्यालय, देसाईगंज (वडसा) येथे प्राणिशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
प्रत्येक मोठ्या यशामागे संघर्षाची एक कहाणी असते. डॉ. पुसाला यांच्या यशस्वी प्रवासाची पाळेमुळे कमलापूरच्या मातीत आणि येथील शैक्षणिक संस्कारांत रुजलेली आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेतून निर्माण झालेल्या सुप्रसिद्ध श्री गुरुदेव आश्रमशाळेत त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची पायाभरणी झाली. महाराष्ट्रातील पहिली आश्रमशाळा म्हणून ओळख असलेल्या या संस्थेने आजवर अनेक विद्यार्थ्यांना घडवून विविध उच्च पदांपर्यंत पोहोचविले आहे. याच शाळेतून शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या सत्यनारायण पुसाला यांनी आज डॉक्टरेटपर्यंत मजल मारत आपल्या शाळेचा आणि गावाचा नावलौकिक वाढविला आहे. एका छोट्याशा गावातील आश्रमशाळेतून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज संशोधनाच्या उच्च शिखरावर पोहोचला आहे.
कमलापूर म्हटले की, राज्यातील एकमेव शासकीय हत्तीकॅम्प, छत्तीसगड राज्याचा राज्यप्राणी असलेल्या रानम्हशींचे अस्तित्व, दुर्मिळ गिधाडांचा अधिवास आणि समृद्ध वनसंपदा अशी वैशिष्ट्यपूर्ण ओळख डोळ्यांसमोर येते. वन्यजीव आणि पर्यटनाच्या दृष्टीने राज्यात वेगळे स्थान निर्माण केलेल्या या गावाने आता शिक्षणाच्या क्षेत्रातही आपली नवी ओळख निर्माण केली आहे.गावातील अनेक तरुणांनी विविध क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध केले असून, शासकीय, निमशासकीय आणि इतर महत्त्वाच्या पदांवर ते कार्यरत आहेत. मात्र, गावातील पहिले एम.एस्सी. पदवीधर आणि त्यानंतर पहिले डॉक्टरेटधारक होण्याचा मान डॉ. सत्यनारायण पुसाला यांनी मिळविला, ही बाब विशेष अभिमानास्पद आहे.निसर्गाच्या वैभवाने समृद्ध असलेल्या कमलापूरच्या शिरपेचात आता शैक्षणिक यशाचा मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या यशस्वी प्रवासात त्यांच्या आई-वडिलांसह भाऊ आणि पत्नी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच मोहसीनभाई झवेरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र अरेकर, सहकारी प्राध्यापक आणि मित्रपरिवार यांनीही त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले. कुटुंबीयांचे पाठबळ, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची जिद्द या बळावर त्यांनी हे यश संपादन केले.
एका भूमिपुत्राचे यश, संपूर्ण गावाचा अभिमान!
दुर्गम भागात जन्माला आलो म्हणून स्वप्नांना मर्यादा नसतात, तर जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर कोणतेही शिखर गाठता येते, हे डॉ. सत्यनारायण पुसाला यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. त्यांचे हे यश केवळ वैयक्तिक शैक्षणिक उपलब्धी नसून, ग्रामीण आणि आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांसाठी आशेचा नवा किरण आहे.
आज कमलापूरच्या या भूमिपुत्राने मिळविलेल्या आचार्य पदवीमुळे गावातील प्रत्येक नागरिकाची मान उंचावली आहे. त्यांच्या यशातून गावातील नव्या पिढीला उच्च शिक्षण, संशोधन आणि ज्ञानाच्या क्षेत्रात भरारी घेण्याची प्रेरणा मिळणार आहे. वनवैभवाने ओळखल्या जाणाऱ्या कमलापूरने आता ज्ञानवैभवाचीही पताका फडकविली आहे. डॉ. सत्यनारायण पुसाला यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.












