वरोरा | प्रतिनिधी
वरोरा शहर काँग्रेसमधील ज्येष्ठ व कट्टर कार्यकर्ते, माजी नगरसेवक छोटुभाई शेख यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक दशकांपासून पक्षाशी निष्ठा ठेवणाऱ्या छोटुभाईंनी पक्ष नेतृत्वावर गंभीर आरोप करत हा निर्णय घेतला आहे.
छोटुभाई शेख यांनी आरोप केला आहे की, पक्षाने उमेदवारी दिल्यानंतरही काही नेत्यांनी माझ्या विरोधात अपप्रचार केला आणि अपक्ष उमेदवाराचा प्रचार करून त्याला निवडून आणले. त्यामुळे मी मनोमन व्यथित असून, अशा वातावरणात काम करणे शक्य नाही.
नगरपरिषद सदस्य म्हणून कार्यरत असताना छोटुभाईंनी शहरातील विकासकामांवर भर दिला होता. त्यांच्या कार्यकाळात अनेक मूलभूत सुविधा उभारण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. मुस्लिम समाजासह सर्व समाजघटकांत त्यांचा चांगला जनसंपर्क होता.
छोटुभाईंनी घेतलेल्या या निर्णयामुळे काँग्रेस पक्षात अंतर्गत अस्वस्थता निर्माण झाली असून, त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. छोटुभाई शेख पुढे कोणता राजकीय मार्ग स्वीकारतील, याकडे आता वरोऱ्याचे राजकीय लक्ष लागले आहे.













