कापूस वेचणी आणि इतर शेतीच्या कामासाठी पिकअप वाहणाने तेलंगाणा राज्यात जात असताना भराधाव ट्रकने धडक दिल्याने 3 महिला मजुरांचा मृत्यू झाला तर 14 जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
गडचिरोली: लगताच्या तेलंगाना राज्यात सोमवारी (22 डिसेंबर ) रोजी पहाटेच्या सुमारास मंचेरियाल-हैदराबाद महामार्गावरील इंदाराम गावाजवळ एका उभ्या पिकअपला कोळसा वाहून बेनाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील तीन महिला शेतमजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत आणखी १४ जण जखमी झाले असून त्यांच्यावर मंचेरियाल जिल्हा मुख्यालयात उपचार सुरु आहेत. पोटाची खडकी भरण्यासाठी जाणाऱ्या या मजुरांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त केला जात आहे.
या दुर्दैवी घटनेत चंद्रपूर जिल्ह्यातील मीना लाटेलवार (४५), नीलूबाई मानरे (६०) आणि इमलीबाई सय्यम (४५) या तिघी रोजंदारीवर काम करणाऱ्या शेतमजूर होत्या. पहाटे ३.३० ते ४ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींमध्ये बहुतेक महिला असून बहुतांश मजूर सावली तालुक्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.
चंद्रपूरातील सावली तालुक्यातील २३ शेतमजूर राशन घेऊन मुलांसह करीमनगर जिल्ह्यात कामासाठी निघाले होते. लघुशंकेसाठी जीप मंचेरियाल जिल्ह्यातील इंदाराम गावा जवळील रस्त्याच्या कडेला उभी करून थांबले असताना भरधाव ट्रकने धडक दिली. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा संशय आहे. महबुबाबाद जिल्ह्यातील ट्रक चालक बानोत रमेश यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
तेलंगणातील शेतकरी महाराष्ट्रातील गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील मजुरांची कापूस काढणी, भातरोपे रोवणे आदी कामांसाठी वापर करतात. सदर मजूरवर्ग मुक्कामाने आणि कमी खर्चात काम करायला जात असल्याने तेलंगणा राज्यात या मजुरांची मोठी मागणी आहे हे विशेष.













