1 लाख 75 हजार शासनाकडे जमा; उर्वरित रक्कमही लवकरच वसूल होणार – तहसीलदारांची माहिती
गोंडपिपरी ( सुरज माडूरवार )
पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ येथील अतिवृष्टी अनुदानातील बोगस शेतकरी घोटाळ्यात धडकी भरवणारे तपशील समोर येत असून ग्रामसेवकासोबत त्याचा ऑनलाईन कामात मास्टरमाईंड असणारा “भाचा” देखील या प्रकरणात मास्टरमाईंड असल्याचे व्हायरल ध्वनिफीत वरुन पुढे येत असून आता “भाचा” प्रशासनाच्या रडारवर आल्याची माहिती मिळाली आहे.अनुदान लूट प्रकरणात हा सर्वात मोठा स्फोट ठरत आहे.ग्रामस्थांनी याआधीच या दोघांच्या संगनमताचा आरोप केला होता, मात्र आता पोंभुर्णा तालुक्याबहेरील असणाऱ्या व घाटकुळ येथे शेती नसणाऱ्या गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील अतिवृष्टी अनुदान लाटणाऱ्या बनावट शेतकऱ्यासोबत अनुदान लूट प्रकरणातील मुख्य संशयित सूत्रधार ग्रामसेवकाच्या भाच्या सोबत झालेल्या संवादाची ध्वनी फित सोशल मिडिया वर व्हायरल झाली असल्याने मामा भाचे घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे.
तपासानुसार,घाटकुळ आणि परिसरातील गावांत बनावट सातबारे तयार करणे, तालुक्याबाहेरील व्यक्तींना शेतकरी दाखवणे आणि मिळालेल्या अनुदानाची रक्कम परत घेऊन वाटप करणे—या संपूर्ण जाळ्यात ग्रामसेवक आणि त्याचा नातेवाईक ‘भाचा’ हे केंद्रस्थानी असल्याचे प्राथमिक पुरावे बोलके ठरत आहेत.
सदर ग्रामसेवकाचा भूतकाळही तितकाच काळा आहे.करंजी ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून नोकरी करताना शासकीय जागेवरील अतिक्रमण, घाटकुळ ग्रामपंचायत कार्यकाळात अनियमितता अशा अनेक वादग्रस्त प्रकरणांचा त्याच्या नावावर ठसा आहे.तरीदेखील सप्टेंबर महिन्यात त्याला जिल्हा प्रशासनाकडून ‘आदर्श पुरस्कार’ दिल्याने ग्रामस्थ आक्रोश व्यक्त करीत आहेत.
दरम्यान,ऑनलाईन कामाचा अनुभव असणारा भाचा हा अनेक बोगस लाभार्थ्यांना उभे करण्यामागील महत्त्वाचा दुवा असल्याची चर्चा आता परिसरात वेगाने पसरत आहे.
प्रशासनाने चौकशी तीव्र केली असून पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक उघड होण्याची दाट शक्यता आहे.
तहसीलदार पोंभुर्णा मोहनिश शेलवटकर यांचे कडून घाटकुळ येथील शासकीय अनुदान घोटाळा याविषयी माहिती घेतली असता 2021,2022,2023 अतिवृष्टी माहिती व घाटकुळ सोबतच संपूर्ण पोंभुर्णा तालुक्यातील गावांची अतिवृष्टी आणि पुरबुडाई अनुदान यादीची पडताळणी मंडळ अधिकारी आणि तलाठी यांचे कडून सुरू असल्याची माहिती मिळाली.
घोटाळ्यातील सूत्रधार ग्रामसेवक सोबतच त्या प्रकरणांमध्ये जे जे व्यक्ती सहभागी आहेत त्या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल अशी माहिती तहसीलदारांनी दिली.
सोमवारी संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आत्तापर्यंत घाटकुळ भ्रष्टाचारातील 1 लाख 75 हजार शासनाकडे जमा झाल्याचे त्यांनी सांगितले उर्वरित रक्कम लवकरच शासनाकडे जमा होणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.













