गोंडपिपरी ( सुरज माडूरवार)
गोंडपिपरी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नुकतेच तालुक्यातील चेकपिपरी येथे शेतकरी भाऊजी पाल यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतानाच, एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गनेशपिपरी गावात आज दि.२६ रविवारी शेतात जनावरांसाठी चारा कापायसाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याने पुन्हा एकदा वाघाच्या दहशतीने तालुका हादरला आहे.
गणेशपिपरी गाव लागून असल्याने चेकपिपरी येथील वाघाच्या हल्ल्यानंतर शेतात काम करायला मजूर मिळेनासे झाले.शेतात जाणे बंद झाले.स्वतःच्या शेतात घरच्याच जनावरांसाठी चारा कापण्यासाठी अल्का पांडुरंग पेंदोर वय ४३ या एकट्याच गेल्या त्यांचे पती पांडुरंग दुपारी शेतात गेले असता पत्नी आढळली नाही.त्यानंतर गावात परतून गावकरी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळून शोधमोहीम राबवली असता सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अल्का पेंदोर हिचा मृतदेह आढळला.अलका पेंदोर या गणेशपिपरी येथील रहिवासी असून त्यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.गणेशपिपरी हे गाव गोंडपिपरीपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असून, या घटनेने गावात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नुकत्याच चेकपिपरी येथे झालेल्या हल्ल्यानंतर ग्रामस्थ आणि शेतकरी वर्ग वाघाला जेरबंद करण्याची मागणी सातत्याने करत आहेत. परंतु, अद्याप वाघाचा बंदोबस्त करण्यात वनविभागाला यश आलेले नाही. परिणामी परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत आणि शेतात जाण्यास घाबरू लागले आहेत.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी गौरकर,गोंडपिपरी क्षेत्र सहाय्यक पुरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले असून,वाघाला पकडण्यासाठी विशेष पथक कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे.
गेल्या आठ दिवसांत दोन व्यक्तींचा बळी घेतल्याने या भागात वाघाचा वावर वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या दोन्ही घटनांमुळे तालुक्यातील ग्रामीण भागात चिंता व अस्वस्थता निर्माण झाली असून,वाघाला जेरबंद करण्याची मागणी तीव्र झाली आहे. घटनेनंतर गावकरी आक्रमक झाले असून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला असून घटनास्थळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली.अल्का पेंदोर यांच्या पछ्यात मुलगा, पती,मृतक महिलेची आई आहे.













