नांदेड प्रतिनिधी : बालाजी पाटील बाभळीकर
कपाळावर मोठ्ठं कुंकू, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि बोलण्यात नेहमीच बेधडकपणा हा आहे हादगाव-हिमायतनगर तालुक्याच्या मातीतला आवाज, सूर्यकांता पाटील.
कोणी नाराज होईल म्हणून शब्द गिळणं त्यांना कधीच जमत नाही; मनातलं स्पष्ट बोलणं हीच त्यांची खरी ओळख.
स्वातंत्र्यसैनिक घराण्यात जन्मलेल्या सूर्यकांता पाटील यांचे वडील हुतात्मा जयंतराव पाटील हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभागी झालेले लढवय्ये होते. त्यांची आई आ. अंजनाबाई पाटील यांनी आमदार म्हणून जनसेवा केली. समाजसेवेचा आणि निर्भीडतेचा हा वारसा सूर्यकांता ताईंना लहानपणापासूनच मिळाला.
राजकारणात आज अनेक जण पद, प्रतिष्ठा आणि स्वार्थासाठी धडपडत असताना, सूर्यकांता ताईंचं आयुष्य हे निस्वार्थी राजकारणाचं वेगळं उदाहरण ठरतं. भारतीय जनता पक्षात तब्बल दहा वर्षे काम करताना त्यांनी कधीही वैयक्तिक टीका केली नाही. परंतु त्यांच्या शैलीदार वक्तृत्वाकडे आणि राजकीय विचारांच्या खोलीकडे पक्षाने अपेक्षित लक्ष दिलं नाही. वक्तृत्वाची ताकद आणि समीकरणं बदलवण्याची क्षमता असूनही त्यांना योग्य स्थान मिळालं नाही.
अखेर वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी त्यांनी पुन्हा घरवापसी केली राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये परत येत त्यांनी स्पष्ट सांगितलं,कोणत्याही पदाच्या लालसेने नव्हे, तर सामान्य कार्यकर्ता म्हणून शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे.
त्यांच्या या निर्णयाने नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांच्या राजकीय वर्तुळात उत्सुकतेची लाट उसळली आहे. कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरलेली ही परतफेरी म्हणजे जणू जुन्या मार्गावरची गाडी पुन्हा योग्य रस्त्यावर आणल्यासारखी आहे.
त्यांच्या अनुभवाचा आणि वक्तृत्वकौशल्याचा आगामी नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्ष कसा उपयोग करून घेईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सूर्यकांता पाटील या फक्त एक माजी खासदार आणि माजी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री नव्हेत; त्या म्हणजे तडफदार, निडर आणि निस्वार्थी राजकारणाचं प्रतीक आहेत. सत्य, तत्त्वनिष्ठा आणि निर्भीडतेचा मार्ग जपणाऱ्या या ताईंच्या पुनरागमनाने नांदेडच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण झालं आहे.
त्यांचं आयुष्य म्हणजे संघर्ष, निष्ठा आणि आत्मविश्वासाचं प्रेरणादायी मिश्रण, आणि आजच्या राजकारणात अशा रोखठोक ताई म्हणजेच सूर्यकांता पाटील खरंच एक दुर्मिळ प्रेरणा आहेत.













