गोविंद चक्रवर्ती / भामरागड
भामरागड तालुक्यात विजेची पुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी हेमलकसा येथे 33 के.व्ही. सब-स्टेशन उभारण्यात आले आहे. तसेच तालुक्यातील प्रत्येक ग्राहकाने घरात विद्युत मीटर बसवून त्याद्वारे वीज वापर करावा व नियमितपणे देयकाचा भरणा करावा, असा आग्रह महावितरण विभागाकडून नेहमीच केला जातो. मात्र याच विभागाच्या कार्यालयातून विद्युत मीटर चोरीला गेल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील बहुतांश नागरिक अशिक्षित असल्याने अधिकारी वर्गाकडून त्यांची फसवणूक होत असल्याचे उदाहरण या घटनेतून पुन्हा समोर आले आहे. भामरागडच्या महावितरण कार्यालयातील कनिष्ठ अभियंता अभिषेक मडावी यांनी ग्राहकांकडून डिमांड भरण्याच्या नावाखाली रोख रक्कम घेतल्याचा आरोप असून, त्याच्याच काळात कार्यालयातील मीटर गायब झाल्याचे उघड झाले आहे.
मार्च 2025 मध्ये हलवेर येथील दोन ग्राहक नवीन विद्युत मीटरसाठी कार्यालयात गेले असता अभियंता अभिषेक मडावी यांनी प्रत्येकी 2500 रुपये रोख घेतले आणि लवकर मीटर बसवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, अनेक दिवस उलटून गेल्यावरही ग्राहकांना मीटर मिळाले नाही.
जून 2025 मध्ये कार्यालयात 20 मीटर रिप्लेसमेंटसाठी आले होते. त्यापैकी दोन मीटरची कुठेही नोंद न करता सुरक्षा रक्षकांना तोंडी आदेश देऊन हलवेर गावातील संबंधित ग्राहकांकडे बसवण्यात आले.
यानंतर जुलै 2025 मध्ये मीटर रिप्लेसमेंटचे काम सुरू झाले असता चार मीटर कमी असल्याचे हिशोबात आढळून आले. चौकशीदरम्यान हलवेर गावात दोन मीटर असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून चौकशी पुढे सरकली असता अभिषेक मडावी यांनी विविध ग्राहकांकडून एकूण 15 हजार 200 रुपयांची वसुली केल्याचा खुलासा झाला.
अभिषेक मडावी यांच्याविरुद्ध यापूर्वीही गैरप्रकार झालेले आहेत. ते जिवती येथील वीज वितरण केंद्रात कार्यरत असताना विद्युत मीटर चोरीच्या प्रकारामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तरीदेखील महावितरण विभागाकडून त्यांच्यावर कठोर कारवाई न केल्याने त्यांचे धाडस वाढत असल्याची चर्चा सुरू आहे.
विभागाकडून मौन?
या गंभीर प्रकरणावर महावितरण विभाग मौन का बाळगतोय, हा प्रश्न उपस्थित होत आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी ग्राहकांची मागणी आहे.कार्यालयात अशा प्रकारची घटना घडल्याची मला कोणतीही माहिती नाही. याबाबत मला काहीही कल्पना नाही.
प्रभारी उपकार्यकारी अभियंता रमाकांत देवगडे













