मुल प्रतिनिधी
तालुक्यातील शेतकरी बांधवांना सहकार तत्वावर दरवर्षी बाजारभावापेक्षा कमी दरात रासायनिक खते व सर्व प्रकारची कीटकनाशके तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी आदर्श सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती, मूल नेहमीच पुढाकार घेत आहे.
या समितीचे मार्गदर्शन प्रदेश काँग्रेसचे महासचिव, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोषसिंह रावत करीत असून, सभापती पुरुषोत्तम भुरसे, उपसभापती विनोद गाजेवार आणि अनुभवी संचालक मंडळ यांच्या सहकार्याने समितीने शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रभावी कामगिरी केली आहे.
सन २०२३ च्या खरीप हंगामापासून ते ऑक्टोबर २०२४ पर्यंत शेतकऱ्यांना लागणारी रासायनिक खते व कीटकनाशके सर्वात कमी दरात उपलब्ध करून देण्यात समिती यशस्वी ठरली आहे. याच काळात युरिया खताच्या तुटवड्यामुळे शेतकरी चिंतेत होते. शासनस्तरावर उपलब्धता नसतानाही संतोषसिंह रावत यांनी सतत पाठपुरावा करत शासनाकडे ठाम मागणी रेटून धरली. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन मूल तालुक्यातील पहिल्या समितीला २० टन युरिया खताचा पुरवठा करण्यात आला.
युरिया खताची आतुरतेने वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना आता सोसायटीच्या कार्यालयातून हे खत वाजवी दरात उपलब्ध होत आहे. यापूर्वीही समितीमार्फत शेतकऱ्यांना लागणारी रासायनिक खते पुरवली गेली होती. खत पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संतोषसिंह रावत यांनी चर्चा करून हा पुरवठा निश्चित केला.
शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन व तांत्रिक सल्ला देण्यासाठी समितीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे, उपसभापती विनोद गाजेवार, संचालक मंडळ तसेच व्यवस्थापक संदीप आलेवार यांचा मोठा सहभाग राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची महत्त्वाची अडचण दूर झाल्याने तालुक्यातील शेतकरी बांधवांनी संतोषसिंह रावत, समितीचे पदाधिकारी व संचालक मंडळाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.













