भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे, राज्यात २१ ऑगस्ट २०२५ पर्यंत अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीसह अत्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता देण्यात आली आहे. मराठवाडा मध्ये काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता. वीज चमकणे, गडगडाट, वादळी वारे (४०) ५० किमी/ताशी) यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण किनारपट्टी: १६ ते २० ऑगस्ट दरम्यान ५०–६० किमी/ताशी वा-यासह समुद्रात खवळलेली स्थिती राहणार असून मच्छीमारांनी या कालावधीत समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सचेत ॲपमार्फत नागरिकांना सूचना आपत्तीपासून सतर्क राहण्यासाठी सद्यस्थितीमध्ये नागरीकांना सचेत ॲपमार्फत अलर्ट संदेश पाठविले जात आहेत. आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना आपत्कालीन परिस्थिती करिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील अंबा नदीने धोका पातळी तसेच कुंडलीका नदी व रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी आणि कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली असून याबाबत नागरिकांना सूचित करण्यात आले आहे. नागरिकांनी पूरस्थिती पासून सुरक्षित राहण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सूचना देण्यात आल्या असून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.













