गडचिरोली: राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याला देखील याचा खूप मोठा फटका बसला आहे.१८ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने पुन्हा एकदा भामरागड तालुक्याचा जगाशी संपर्क तुटला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात १८ ऑगस्ट पासून परत एकदा पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील नदी,नाले तुडुंब भरून वाहत असून भामरागड तालुक्यातील तिन्ही नद्यांच्या रौद्ररूप बघायला मिळत आहे. दरम्यान १८ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास पार्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने आलापल्ली ते भामरागड (१३०-डी) या राष्ट्रीय महामार्गावरील रहदारी ठप्प झाली आहे.
१९ वर्षीय तरुण गेला वाहून
भामरागड तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दरम्यान याच भामरागड तालुक्यात एक दुःखद घटना देखील समोर आली असून काल १८ ऑगस्ट रोजी कोडपे गावातील १९ वर्षीय लालचंद कपिलसाय लकडा दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास खंडी नाला ओलांडताना नाल्याच्या पुरामध्ये वाहून गेला आहे.
प्रशासनातर्फे सदर व्यक्तीचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे यांनी सांगितले आहे.













