महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचा वांद्रे येथे पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज ठाकरे यांची मुलुख मैदान तोफ गरजली.
उपस्थित सर्व मनसैनिकांना कानमंत्र देताना राज ठाकरे म्हणाले वीस वर्षांनी जर ठाकरे शिवसेना आणि मनसे अर्थातच आम्ही दोघे भाऊ एकत्र येऊ शकतो, तर मग तुम्ही विनाकारण एकमेकांमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका.
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.
पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना, राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला जोरदार तयारीला लागण्याचे आदेश यावेळी दिले. तसेच पदाधिकाऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकरचा वाद होऊ नये यासाठी खास कानमंत्र देखील दिला. तर योग्य वेळी योग्य सूचना दिल्या जातील, असेही राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावर बोलताना राज ठाकरे यांनी मतदार यादीवरूनही भाष्य केले. ते म्हणाले की मतदारयादी एकदा तपासून घ्या. जुने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने सोबत घ्या. मतदारयादीवर विशेष काम करा आणि मतदार याद्या तपासा, अशी सूचनाही राज ठाकरे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिली.
राज ठाकरे यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पूर्वीच पोहोचल्या आहेत. जर आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर येऊ शकतो, तर तुमच्यात वाद ठेवू नका एकोप्यानं काम करा, असा सल्ला राज यांनी दिला असल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी मेळाव्याला बोलताना, आपला पक्ष मुंबईत सर्वात जास्त बलवान आहे. यावेळी मुंबई महापालिकेत सत्ता आपलीच येणार असून हे टाळ्या वाजवण्यासाठी बोलत नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, मराठीच्या मुद्द्यावरूनही राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. ते म्हणाले की, विनाकारण कोणालाही मारू नका आधी समजवून सांगा. मराठी शिकायला बोलायला तयार असेल, तर शिकवा. उर्मट बोलत नसेल तर वाद घालू नका, पण उर्मट बोलला तर मग पुढे तशी भूमिका घ्या, असेही त्यांनी सांगितले. तसेच या घटेनाचा व्हिडिओ काढू नका, असाही पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला असल्याचा बाळा नांदगाववर यांनी सांगितले.













