कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काही दिवसांपूर्वी सरकारचा भिकारी असा उल्लेख केला होता. असे असताना देखील त्यांचा राजीनामा न घेता त्यांच्यावर दुसरं खातं सोपवण्यात आले. यावर भाष्य करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्र शासनाला ‘भिकारी’ म्हणून राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळविणाऱ्या मंत्रीमहोदयांना नारळ देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री महोदयांनीच पुढाकार घ्यायला पाहिजे. विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून त्यांना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रीपद देण्याचा निर्णय खरोखरच अनाकलनीय आहे. या सरकारचे प्राधान्यक्रम काय आहेत याची चिरफाड यामुळे झाली. एकिकडे राज्यातील तरुण पिढी ऑनलाईन रमीच्या मागे लागून बरबाद होत आहे. तिच्यावर बंदी घालण्याची मागणी होत असताना माणिकराव कोकाटे यांना विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून क्रीडा व युवक कल्याण यासारखे महत्वाचे खाते दिले जाते यासारखा दुसरा क्रूर विनोद नाही.
माणिकराव कोकाटे यांच्याकडे असलेलं कृषी खातं दत्तात्रय भरणे यांच्याकडे सुपूर्द केले असून त्यांच्याकडील क्रीडा आणि युवक कल्याण विभागाची जबाबदारी कोकाटेंवर सोपवण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी टोलेबाजी करायला सुरुवात केलीय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील कोकाटेंवर हल्लबोल केला. त्या म्हणाल्या, “राज्यातील कृषी क्षेत्र पुर्णपणे कोलमडून पडलेले असताना विधिमंडळात बसून रमी खेळणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किती संवेदनशील असतील? याहून कहर म्हणजे या कृषीमंत्र्यांचे केवळ खाते बदलून अभय देणारे सत्ताधारी किती गंभीर असतील ? याची शंका आल्याशिवाय राहत नाही. आपले पद आणि जबाबदारी यांची किंचितही जाणीव नसणारी व्यक्ती मंत्रीमंडळात आहे याची खरंतर राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महोदयांना खंत वाटली पाहिजे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांची विधिमंडळातील कामकाजादरम्यान रमी खेळतानाची व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कोकाटेंची कानउघाडणी केली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील त्यांना ‘इजा, बिजा, तिजा’ अशा शब्दांत चेतावणी दिली. या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांची कृषिमंत्री पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.













