कोरची
एका बाजूने विद्यार्थी विकास आणि दुसऱ्या बाजूने समाज व राष्ट्राच्या विकासात योगदान देणारी राष्ट्रीय सेवा योजना ही दुहेरी विकास साधणारी प्रक्रिया आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या नियमित कार्यक्रमातून वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजजागृतीचे व समाजविकासाचे कार्य पार पाडले जाते. समाजावर व देशावर जेव्हा जेव्हा संकटे येतात तेव्हा राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक त्या संकटांचा सामना करण्यासाठी नेहमीच पुढे असतो. राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून विद्यार्थ्यांवर केले जाणारे संस्कार त्यांच्या भावी आयुष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहेत. असे मत कार्यकारी प्राचार्य डॉ. व्ही. टी. चहारे यांनी वनश्री महाविद्यालय कोरची तर्फे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून ते मत व्यक्त केले.
सविस्तर वृत्त असे की, कोरची येथील वनश्री कला व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर दिनांक ०८ मार्च ते १४ मार्च २०२२ पर्यंत गहाणेगाटा तालुका कोरची येथे आयोजित करण्यात आले होते. दिनांक १३ मार्च २०२२ ला या शिबिराचा समारोपीय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गड़चिरोली भारतीय माहिती अधिकार न्यूज़ नेटवर्क संपादक आशिष अग्रवाल,कोरचीचे माजी उपसरपंच नंदुभाऊ वैरागडे, सरपंच सावजी बोगा, पोलीस पाटील भगवानसाय बोगा, लोकमत प्रतिनिधी राहुल अंबादे, देशोन्नती प्रतिनिधी राष्ट्रपाल नखाते,शहीद बिरसा मुंडा विद्यालयाचे मोगरकार सर,तानुरामजी पोरेटी आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित ग्रामवासी आणि शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आशिष अग्रवाल म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी या सात दिवसांत जो स्वच्छतेचा संदेश आपल्या कृतीतून गावाला दिला त्याचे महत्व लक्षात घेऊन ३५८ दिवस ग्रामवासियांनी आपल्या गावात स्वच्छता ठेवावी. आपल्या आणि गावाच्या विकासासाठी आपले आणि गावाचे आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहणे आवश्यक आहे. शिकलेल्या युवकांनी केवळ शहरांचा रस्ता न धरता आपल्या गावाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना नंदू वैरागडे यांनी सामाजिक कार्यासोबतच विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडेही लक्ष द्यावे असे मत व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजनेतून उपलब्ध होणारे व्यासपीठ विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी महत्वाचे ठरते. या शिबिरातून विद्यार्थ्यांवर केले जाणारे श्रमसंस्कार सुशिक्षितांना श्रमाचे मोल पटवून देण्यासाठी उपयुक्त ठरतात, असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. यावेळी शिबिरात आलेले अनुभव सहभागी स्वयंसेवक विनिश आडूलवार, चेतना भोयर, मिथून फुलकवर, अंकित नंदेश्वर, धर्मीन भक्ता यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि अहवाल वाचन प्रा. प्रदिप चापले यांनी केले. या शिबिरादरम्यान शिबिरार्थ्यांनी श्रमदानातून नालीसफाई व ग्रामस्वच्छता, नाल्यावर बंधारा बांधकाम तसेच गोटूल जवळ सामुहिक शौचालयासाठी खड्डा तयार करण्याचे कार्य केले. या शिबिरादरम्यान दिनांक १० मार्चला ‘ग्रामविकासात ग्रामसभेची भूमिका’ या विषयावर श्री. देवाजी तोफा लेखा मेंढा यांचे व ‘ग्रामविकासात बचत गटांचे महत्त्व’ या विषयावर प्रा. संजय दोनाडकर यांचे व्याख्यान झाले. या सत्राचे अध्यक्ष प्रा. सी. एस. मांडवे हे होते. दिनांक ११ मार्चला ‘कोरोना संकटात लसीकरणाचे महत्त्व’ या विषयावर डॉ. शुभम वायाळ यांचे व ‘भारतीय स्वातंत्र्याची पंचाहत्तर वर्षे’ या विषयावर प्रा. आर. एस. रोटके यांचे व्याख्यान संपन्न झाले. या सत्राचे अध्यक्ष डॉ. एम. डब्ल्यू. रुखमोडे हे होते. ‘राज्यशासनाच्या विविध पद्धतींमध्ये लोकशाहीचे महत्त्व’ या विषयावर डॉ. व्ही. टी. चहारे यांचे व ‘लोकशाहीत मतदारांची भूमिका व जबाबदारी’ या विषयावर प्राचार्य श्री. देवराव गजभिये यांचे व्याख्यान संपन्न झाले. शिबिरादरम्यान रात्रो ८ ते १० वाजता दरम्यान होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांनी ग्रामवासियांचे उद्बोधन केले.
समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबिरार्थी दीपक हुमणे यांनी केले तर आभार शिबिरार्थी कु. अंजली बोगा यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गहाणेगाटा येथील समस्त ग्रामवासी, वनश्री कला व विज्ञान महाविद्यालय कोरची येथील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, सर्व शिबिरार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक यांनी मोलाचे सहकार्य केले.