मुंबई (विशेष प्रतिनिधी) :- शरद पवार म्हणाले की, 2019 आणि 2024 मधील निवडणुकीत फरक आहे. मोदी विरोधात अंडरकरंट आहे. समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, लोकजनशक्ती पार्टी, वायएसआर काँग्रेस, टीडीपी, भारत राष्ट्र समिती यापक्षांच्या नेत्यांना, त्यांच्या मुलामुलींवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. घराणेशाहीचा आरोप होत आहे. त्यामुळे हे सर्व एक व्यापक दृष्टीकोणातून एका ठिकाणी येतील असं शरद पवार म्हणाले.
ज्या पद्धतीने 1977 मध्ये मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वात जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले होते. तेव्हा मोरारजी देसाई यांना पक्षांतर्गत समर्थन कमी होते, त्यापेक्षाही जास्त समर्थन सध्या राहुल गांधींना त्यांच्या पक्षांतर्गत आहे. राहुल गांधी हे सर्व प्रादेशिक पक्षांसोबत संबंध ठेवून आहेत, असेही शरद पवार म्हणाले.
सध्याची परिस्थितीत सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. विरोधातील सर्वांची विचारसरणी ही सर्वसाधारण एकसारखीच आहे. त्यामुळे आम्ही निवडून आलो तर स्थिर सरकार दिले पाहिजे यासाठी सर्व एकत्र येतील असेही शरद पवार म्हणाले. लोकांना भाजपने पक्ष फोडणे आवडलेले नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत झालेली फाटाफूट आणि त्यानंतर मोदींसोबत गेलेले नेते हे लोकांना आवडत नाहीत असेही शरद पवार म्हणाले.