भामरागड
मौजा मर्दहूर, तालुका भामरागड येथे अंतरराष्ट्रीय महिला दिवस, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतीदिवस व क्रांतीवीर बाबूराव शेडमाके जयंती निमित्त दोन दिवसीय सामाजिक व सांस्कृतिक जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हे कार्यक्रम मौजा मर्दहूर येथील भव्य गोटूल भूमीवर पार पडले. विशेष म्हणजे 8 मार्च रोजी संपूर्ण जगभर अंतरराष्ट्रीय महिला अधिकार दिवस साजरा केला जातो. आजही भारतीय सामाजात महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. एकेकाकाळी मातृसत्ताक कुटुंबपद्धत अस्तित्वात असलेल्या आदिवासी समुदायातही हिंदुत्वकरणामुळे महिलांना निर्णय प्रक्रियेत भाग घेता येत नाही. तसेच सावित्रीबाई फुले यांनी भारतात पहिल्यांदाच स्त्री शिक्षणाला सुरुवात केली. सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे पती महात्मा जोतीराव फुले यांच्यासोबत भारतीय समाजात अश्पृश्य व अनिष्ट चालिरिती समूळ नष्ट झाले पाहिजे यासाठी मोठा लढ़ा उभा केला. हे सर्व करतांना त्यांना अपमान, हालअपेष्ट सहन करावे लागले. त्याचबरोबर वीर बाबूराव शेडमाके यांनी जल, जंगल, जमीनीवर जनतेचा अधिकार कायम असले पाहिजे, जमीनदारी, भांड़वालशाही व्यवस्था नष्ट होऊन नैसर्गिक संसाधनांवर सर्वांचे समान हक्क असले पाहिजे यासाठी त्यांनी जंगोम दल स्थापन करून इंग्रजांच्या विरोधात लढ़ा उभा केला. येथील मूलनिवासींवर बळजबरीने लगान (कर) लावून जुलुम करणाऱ्या अन्यायकारी शासनाच्या विरोधात त्यांनी मोठा लढ़ा उभा केला. यात त्यांनी इंग्रजांची सळो की पळो अशी अवस्था केली होती. परंतू या महान क्रांतीकारकाचे नाव इतिहासाच्या पुस्तकातून गायब करण्यात आले आहे. या सर्व घटनांचे आदिवासींच्या जीवनात महत्वाचे स्थान आहे. म्हणून दिनांक 10 मार्च ते 11 मार्च 2022 रोजी ग्रामसभांचा सामाजिक व सांस्कृतिक मेळावा मौजा मर्दहूर तालुका भामरागड येथे आयोजित करण्यात आला होता. सदर मेळाव्याचे आयोजन ग्रामसभा मर्दहूर व भामरागड पट्टी पारंपारिक इलाका गोटूल समीती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या सामाजिक व सांस्कृतिक मेळाव्यात भामरागड तालुक्यातील अनेक ग्रामसभांचे शेकडो कार्यकर्ते व महिला पुरुष उपस्थित होते.
या मेळाव्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे दिनांक 10 मार्च 2022 रोजी अंतरराष्ट्रीय जागतिक महिला अधिकार दिवस व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिवसानिमित्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रा अनेक महिला कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता. यात डॉ. अनघा आमटे, समीक्षा आमटे, लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा, गोई कोडापे, सभापती, पंचायत समीती, भामरागड, रासो मड़ावी, सरपंच ग्राम पंचायत टेकला, तारा मड़ावी, सरपंच ग्राम पंचायत बोटनफूंडी, राजश्री लेकामी, आंगनवाड़ी सेविका, मरकनार, सपना रामटेके, आंगनवाड़ी सेविका, भामरागड आदींचा समावेश होता. या चर्चासत्रात उपस्थित जनतेशी संवाद साधतांना डॉ. अनघा आमटे म्हणाले की, महिलांना स्त्री-पुरुष समानतेचा अधिकार असल्याचे माहित नाही. जोड़ीदार निवाड़ीचा मुलीला स्वतंत्र हक्क आहे. तिच्यावर कोणीही जबरदस्ती करू शकत नाही. तसेच आदिवासी सामाजात मासिक पाळीदरम्यान महिलेला घरी प्रवेश नसतो. ती कुर्मामध्ये राहते. काही गावात कुर्मा गावाच्या बाहेर असतो. त्यामुळे महिलेला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. मासिकपाळीदरम्यान महिलांचे मूलभूत हक्काचे हनन होत आहे. त्यामुळे ही प्रथा बंद होणे काळाची गरज आहे. असे मत डॉ. अनघा आमटे यांनी व्यक्त केले. पुढे ते म्हणाले की, मावा नाटे मावा राज! मावा नाटे माटे सरकार!! नावा मेंदूल नावा जबाबदारी!!! नावा मेंदूल नावा अधिकार!!!!
या प्रसंगी लोक बिरादरी प्रकल्पाचे संचालिका समीक्षा आमटे म्हणाले की, निसर्गात विविधता आहे. माणसा माणसातही विविधता आहे. परंतू आपण सर्व फक्त भात भाजीच खातो. त्यामुळे आपल्यामध्ये शारीरिक क्षमतेचा अभाव आहे. अनेक आज़ार होतात. म्हणून शेतामध्ये भाताबरोबरच कोसरीसारखे कड़धान्याची लागवड करावी. त्यातून जेवन वैविधातापूर्ण होईल.
या चर्चासत्रात जनतेशी संवाद साधतांना सभापती गोई कोडापे म्हणाले की, या अशा कार्यक्रमातून महापुरुषांचे विचार जाणून घेता येईल. तसेच कार्यकर्त्यामध्ये विचारांची देवाण घेवाण होतो. पुढे ते म्हणाले की, आजही महिलांवरील अन्याय अत्याचार कमी झाले नाहीत. महिलेला समजून घेण्याची मानसिकता या पुरुषसत्ताक व्यावस्थेत नाही.
या चर्चासत्रात रासो मड़ावी, तारा मड़ावी, राजश्री लेकामी, सपना रामटेके आदींनी सक्रिय सहभाग घेऊन आपापले विचार मांडले.
या कार्यक्रमादरम्यान अनेक ग्रामसभेच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या ग्रामसभेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.