राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प नागपूर ते गोवा असा प्रस्तावित ‘शक्तीपीठ महामार्ग’ सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरत आहे. एकीकडे विकासाच्या नावावर या प्रकल्पाला वेग दिला जात असताना, दुसरीकडे या महामार्गाविरोधात स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ रस्त्यावर उतरत आहेत. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात याबाबत जनतेत प्रचंड अस्वस्थता असून, अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे पोहोचल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि सध्या भाजपचे खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गातील सावंतवाडी येथे जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि माध्यमांसमोर आपली स्पष्ट भूमिका मांडली. त्यांच्या भाषणाने पुन्हा एकदा राजकीय वादळ निर्माण केलं आहे. सावंतवाडीत आयोजित बैठकीत बोलताना राणे म्हणाले, “शक्तीपीठ महामार्ग हा जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. काही लोक याला विरोध करत आहेत.
पण विरोधासाठी फक्त विरोध करणाऱ्यांना योग्य उत्तर दिलं जाईल. विकासाच्या मार्गात अडथळा आणणाऱ्यांना आम्ही फटके देऊ. त्यांनी पुढे असंही नमूद केलं की, जंगलं कोणी राखत नाहीत. ती आपोआप राखली जातात. वन्यजीव त्यांचं संरक्षण करतात. त्यामुळे पर्यावरणाच्या नावावर विकास रोखण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.













