महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारित “फुले” चित्रपट टॅक्स फ्री करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विधानसभा सदस्य जयंत पाटील यांनी मागणी केली आहे. आपल्या गौरवशाली इतिहासाचा ठसा प्रत्येकाच्या मनात उमटला पाहिजे, जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात जयंत पाटील म्हणाले आहेत की, जय शिवराय, २५ एप्रिल २०२५ रोजी दिग्दर्शक अनंत महादेवन यांचा “फुले” हा चित्रपट जगभरात प्रसिद्ध झाला असून प्रेक्षकांची मोठी पसंती या चित्रपटाला मिळत आहे. हा चित्रपट अधिकाधिक लोकांना पहायला मिळावा म्हणून टॅक्स फ्री करण्यात यावा अशी आमची मागणी आहे. दलितांना पाण्याचा हौद खुला केला, शिक्षणासाठी दारे उघडे केली, स्त्री शिक्षणासाठी पाऊल टाकले इतकाच मर्यादित महात्मा फुले आणि सावित्रीमाईंचा इतिहास नाही. तर त्याहूनही व्यापक काम महात्मा फुले आणि सावित्रीमाईंनी करून ठेवले आहे. त्यांच्या कार्याचा प्रभाव इतका अफाट आहे की जसा १९ व्या शतकात त्यांच्या कार्याला विरोध केला गेला, तितकाच विरोध २१ व्या शतकात त्यांच्या चित्रपटाला झाला. परिणामी चित्रपटातील जवळपास १२ सीन्स सेन्सॉर बोर्डाने कापले. परंतु महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाईंचे विचार तोकडे पडले नाहीत.
या चित्रपटातून आपल्याला समाज उन्नतीसाठी उभारलेल्या चळवळीचा जिवंत इतिहास पहायला मिळेल. त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की “फुले” चित्रपट टॅक्स फ्री करत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परिवर्तनवादी, पुरोगामी महाराष्ट्र घडवणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान झाला पाहिजे.













