मळगंगा लॉन्सजवळ युवकाला धमकी व मारहाण; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
प्रतिनिधी, शिरूर | दिनांक : २ मे २०२५
शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावाच्या हद्दीत असलेल्या मळगंगा लॉन्स मंगल कार्यालयाबाहेर एका युवकाला धमकी देऊन मारहाण केल्याचा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी फिर्याद श्री. सूरंजन बिजेन गव्हाणे (वय २५, रा. आण्णापूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिली आहे. फिर्यादी हे खासगी नोकरी करत असून, त्यांना काही दिवसांपूर्वी एमआयडीसीतील कामावरून वाद झाला होता. त्याच रागातून त्यांना धमकावण्यात आले, असे पोलीस तपासात समोर आले आहे.
घटनेचा तपशील:
दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजण्याच्या सुमारास आमदाबाद गावातील मळगंगा लॉन्सच्या बाहेर विशाल रसीक पवार (रा. आण्णापूर), अजय प्रकाश गव्हाणे (रा. गोपाळवस्ती, शिरूर), अक्षय गि-हे (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) व अन्य चार अज्ञात व्यक्ती असे सातजण एकत्र जमले होते. यावेळी अजय गव्हाणे याने फिर्यादीस उद्देशून “तू मला एमआयडीसीत काम दिलं नाहीस, आता तू तिकडे आलास तर तुझे पाय फोडून टाकीन,” असा धमकीवजा इशारा दिला. याचबरोबर फिर्यादीस आई-बहिणीवर अश्लील व अपमानास्पद शिवीगाळ केली. त्यानंतर अक्षय गि-हे याने फिर्यादीचा डावा हात पिरगळून मारहाण केली.
याच घटनेनंतर आरोपींनी दोन स्विफ्ट कारमधून पाठलाग करत आण्णापूर – आमदाबाद फाटा रस्त्यावरील गतिरोधकाजवळ सायंकाळी ४.५० वाजता पुन्हा एकदा फिर्यादीच्या गाडीवर दगडफेक केली. या प्रकरणात अजय गव्हाणे याने थेट दगड फेकून गाडीचे नुकसान केले, असे फिर्यादीने नमूद केले आहे.
गुन्ह्याचा तपास:
फिर्यादीच्या तक्रारीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २९७/२०२५ नुसार भारतीय दंड विधान कलम १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार बनकर (ब. नं. २४३६) करत असून, अंमलदार म्हणून पो. ह. २४९८ शिंदे यांची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रकरणाचे प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे कार्यरत आहेत.
सध्या सर्व आरोपी फरार असून, शिरूर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. परिसरात या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास हाती घेतला आहे.













