भद्रावती :-शहरातील मूलभूत सुविधांअभावी त्रस्त झालेल्या नागरिकांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेने भद्रावती नगरपरिषदेला ठणठणीत इशारा दिला. शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली विविध समस्या घेऊन नगरपरिषद प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. गेल्या दीड वर्षांपासून प्रशासकाच्या अधिपत्याखाली असलेल्या नगरपरिषदेकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांत नाराजी आहे.
शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था, बंद वीज लाईट्स, पाण्याचा अनियमित पुरवठा, नाल्यांची सफाई न होणे, तसेच सरकारी जमिनीवर वर्षानुवर्षे राहणाऱ्या नागरिकांना अद्याप पट्टे न मिळणे या समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने थेट मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समोर या समस्या मांडल्या.
या वेळी माजी उपनगराध्यक्ष प्रफुल चटकी, माजी नगरसेवक सुधीर सातपुते, युवासेना माजी उपजिल्हा प्रमुख महेश जिवतोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रशासनाने निवेदनाचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं.
भद्रावतीच्या जनतेला मूलभूत सुविधा देण्यास प्रशासन अपयशी ठरत आहे. ही लढाई कोणत्याही राजकीय हेतूने नव्हे, तर सामान्य जनतेच्या हक्कासाठी सुरू आहे.
*शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे*













