चंद्रपूर: वेकोलीच्या निलजई ओपन कास्ट खाण प्रकल्पात कार्यरत जी.आर.एन. कंपनी स्थानिक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी नाकारत असल्याच्या विरोधात युवासेना जिल्हा प्रमुख शैलेश केलझरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मुख्य महाप्रबंधक, वेकोली वणी क्षेत्र, ऊर्जग्राम यांना निवेदन देत हा अन्याय थांबवण्याची मागणी करण्यात आली.
स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळालाच पाहिजे, अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा स्पष्ट इशारा युवासेना जिल्हा प्रमुख शैलेश केलझरकर यांनी दिला. शासनाच्या धोरणानुसार स्थानिकांना रोजगार देणे अनिवार्य असतानाही जी.आर.एन. कंपनीने बाहेरच्या मजुरांना संधी दिल्यामुळे तरुणांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. हा अन्याय थांबवण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी वेकोली प्रशासनाकडे केली.
युवासेनेने स्पष्ट शब्दांत सांगितले की, १५ दिवसांच्या आत स्थानिक बेरोजगारांना न्याय मिळाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील.
निवेदन देतांना युवासेना जिल्हा प्रमुख शैलेश केलझरकर यांच्यासह प्रभाकर बँकटी कुम्मरी, रमेश कोटेकोला, राकेश शिंतला आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच, निवेदनाची प्रत केंद्रीय कोळसा व खाण मंत्री जी. किशन रेड्डी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच वेकोलीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे.
या मागणीवर वेकोली प्रशासन काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.













