सातारा │ सातारा नगरपरिषदेच्या पार्किंग परिसरात संध्याकाळ होताच दारूडे अड्डा जमवतात, खुलेआम मद्यपान करतात आणि रिकाम्या बाटल्यांचा खच टाकून निघून जातात. नगरपरिषदेच्या मुख्य कार्यालयाच्या मागील प्रवेशद्वाराजवळ हा प्रकार सर्रास घडत असूनही प्रशासन मूग गिळून गप्प बसले आहे.
मुख्य प्रवेशद्वार राजपथावर तर मागील प्रवेशद्वार अदालत वाडा रस्त्यावर आहे. येथेच पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी पार्किंग तसेच पालिकेचे मंगल कार्यालयही आहे. मात्र, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळील हा मोकळा परिसर दारूडींच्या अड्ड्यात बदलला आहे.
पालिकेच्या कार्यालयीन वेळेनंतर संयुक्त महाराष्ट्र चौक परिसरात मद्यपी संध्याकाळी जमतात आणि बेधडक मद्यपान करतात. रात्रीपर्यंत सुरू असलेल्या या ‘परमिट रूम’मुळे सकाळी नागरिकांना आणि कर्मचार्यांना बाटल्यांचा खच पाहावा लागतो.
पालिकेच्या आरोग्य विभागाला ही परिस्थिती माहित असूनही ते मुद्दाम दुर्लक्ष करत आहेत. स्वच्छता कर्मचारी रोज परिसर साफ करतात, पण परिस्थिती जैसे थे! त्यामुळे अधिकाऱ्यांना याकडे पाहायचेच नाही का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
नगरपरिषद आणि पोलिस प्रशासन दारूड्यांविरोधात कोणतीही कारवाई करत नाहीत. यांना संरक्षण मिळतेय का? असा सवाल नागरिक विचारत आहेत. जर लवकरात लवकर ठोस पावले उचलली नाहीत, तर संतप्त नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात येणार आहेत!













