चंद्रपूर │ चंद्रपूर जिल्हा कारागृहात सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई यांच्या वतीने ‘जीवन गाणे गातच जावे’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बंदिवानांसाठी संगीत, नृत्य, योग आणि प्रेरणादायी मार्गदर्शनाचा अनोखा संगम अनुभवता आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारागृह अधीक्षक अनुप कुमरे होते. प्रमुख अतिथी म्हणून कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, कौशल्य विकास अधिकारी रोशन गबाले, कारागृह वरिष्ठ निरीक्षक नागेश कांबळे, सतीश सोनवणे, कमलाकर मिरासे, ॲड. चैताली बोरकुटे-कटलावार आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला योग नृत्य परिवाराचे सुरेश घोडके आणि त्यांच्या समूहाने बंदिवानांना योग प्रशिक्षण दिले. त्यानंतर कला श्री आर्ट फाउंडेशनच्या शिक्षिका स्नेहा पारवेकर व विद्यार्थिनींनी कथक आणि देशभक्तीपर नृत्य सादर केले. यावेळी स्वरसुगम संगीत ऑर्केस्ट्रा तर्फे देशभक्ती आणि संस्कृतीवर आधारित गीते सादर करण्यात आली.

यावेळी बोलताना कारागृह अधीक्षक अनुप कुमरे यांनी सांगितले की, बंदिवानांना आनंदी वातावरणात जगता यावे यासाठी शासनाच्या निर्देशानुसार विविध उपक्रम राबवले जात आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यातील कला आणि सकारात्मकता विकसित करणे हे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
सहायक आयुक्त भैयाजी येरमे म्हणाले, “आनंद हा आपल्यातूनच निर्माण होतो. जीवनात चांगले आणि वाईट याची पारख करणे गरजेचे आहे. अशा कार्यक्रमातून सकारात्मक ऊर्जा मिळते.”
कार्यक्रमात गुन्हेगारांची मानसिकता आणि गुन्हेगारीचे दुष्परिणाम यावर धनंजय तावडे यांनी मार्गदर्शन केले, तर ॲड. चैताली बोरकुटे-कटलावार यांनी गुन्हेगारी सोडल्यानंतरचे जीवन यावर विचार मांडले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेजराज चिकटवार, वैशाख रामटेके, रोहित रामटेके, प्रदीप यमनूरवार, सुशील सहारे यांनी विशेष मेहनत घेतली.
संगीत, नृत्य आणि सकारात्मक विचारांच्या या कार्यक्रमामुळे बंदिवानांमध्ये नव्या उमेदचा संचार झाला. काही वेळ का होईना, त्यांनी स्वतःला मुक्ततेचा अनुभव दिला!













