वरोरा :- वरोरा तालुक्यातील विशेष सहाय्य योजनेअंतर्गत अनुदान मिळणाऱ्या लाभार्थ्यांनी १ एप्रिल ते ३१ मे २०२५ दरम्यान हयात प्रमाणपत्र तहसील कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे, असे तहसीलदार कार्यालय वरोरा यांनी कळविले आहे. तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयांनी लाभार्थ्यांना याबाबत माहिती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
विशेष सहाय्य योजनेतून लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी दरवर्षी हयात असल्याचे प्रमाणपत्र तहसील कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे. यासाठी लाभार्थी CSC सेंटर किंवा महाऑनलाइन केंद्रातून प्रमाणपत्र काढू शकतात. हयात प्रमाणपत्रासोबत तलाठी उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक व मोबाईल नंबरही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. निर्धारित मुदतीत प्रमाणपत्र न सादर केल्यास अनुदान वितरित केले जाणार नाही, असा इशारा तहसील प्रशासनाने दिला आहे.
तालुक्यातील सर्व तलाठी व ग्रामसेवकांनी गावोगावी ही माहिती पोहोचवून अधिकाधिक लाभार्थ्यांना प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आदेश तहसीलदार कार्यालयाने दिले आहेत. लाभार्थ्यांनी ३१ मेपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.













