हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी नजीक कोणतेही ऐतिहासिक संदर्भ नसलेली वाघ्या कुत्र्याची समाधी 31 मे पूर्वी शासनाने कायम स्वरुपी हटवावी अशी मागणी रायगड प्राधिकरण चे अध्यक्ष व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
यावर धनगर समाज आक्रमक झाला आहे वाघ्या पुतळ्याला हात लावला तर संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज रायगडावर कूच करेल असा थेट इशारा धनगर समाजाच्या नेत्यानी दिला आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांना राजकीय पोळी भाजायची आणि महाराष्ट्र अशांत करायचा आहे. स्मारकाला हात लावनं तर सोडा नजर ही तिथं पर्यंत पोहचू देणारं नाही. असं धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडतले यांनी म्हटलं आहे.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याच्या छत्रपती संभाजीराजे यांच्या मागणी विरोधात बीडमध्ये सर्व धनगर समाज आक्रमक झाला आहे. अहिल्यादेवीच्या जयंतीची तारीख निवडून महाराष्ट्रात दंगल घडवायची का? राज्यात छत्रपतीनी असंतोष पसरवण्याचे काम करु नये, तसेच वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याला हात लावाल तर गाठ आमच्याशी आहे, असा थेट इशारा बाळासाहेब दोडतले यांनी दिला आहे. तसेच आता संभाजीराजे यांनी अल्टिमेट दिल्यानंतर ओबीसी समाजाचे नेते आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय.
वाघ्या कुत्र्याचे इतिहासात खूप मोठे योगदान आहे. होळकर यांनी जिर्णोद्धार केला म्हणून हा मुद्दा पुढे घेवून आलात का असा सवाल देखील बाळासाहेब दोडतले यांनी विचारला आहे.
श्री क्षेत्र माहुली येथे खंड्या नावाच्या कुत्र्याचा पुतळा कसा चालतो? रायगडावर तुमची मक्तेदारी नाही. इतिहास संपवण्याचं पाप आपण करू नये, असं बाळासाहेब दोडतले यांनी संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
31 मे ची तारीख का निवडली? त्यादिवशी अहिल्या देवीची जयंतीची तारीख आहे, या दिवशी महाराष्ट्रात दंगल तर घडवायची नाही ना? असा संतप्त सवाल बाळासाहेब दोडतले यांनी विचारला आहे.













