अहेरी:पोलिसांनी मुंबई दारूबंदी कायदाअंतर्गत पकडलेली ५७ लाख ३४ हजार ८६० रुपये किमतीची दारू नष्ट केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास १२ वर्षात ही दारू पकडण्यात आली होती.
दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात छुप्या मार्गाने अवैध दारू वाहतूक करून विक्री केली जात आहे. दारू तस्करीचे प्रकार रोजच उघडकीस येत आहेत. सातत्याने होणाऱ्या पोलीस कारवाईने पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात जप्त केलेला दारूसाठा जमा झाला आहे. त्यामुळे अहेरी,पेरमिली, राजाराम आणि वेंकटापूर पोलिसांनी जप्त करण्यात आलेली ५८ लाखांची दारू नष्ट केली.१२ वर्षांपासून या दारूने पोलीस ठाण्याचा मालखाना हाऊसफुल्ल झाला होता. नवीन गुन्ह्यात पकडण्यात येणारी दारू ठेवायची पंचायत झाल्याने पोलिसांनी दारू नष्ट करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. न्यायालयाकडून ही परवानगी मिळाल्यानंतर अहेरी ते महागाव रस्त्यावरील खुल्या जागेवर बुलडोजर चालवून दारूसाठा नष्ट करण्यात आला.
यात अहेरी पोलीस स्टेशनची ५२ लाख,पेरमिली उपपोलीस स्टेशनची ३ लाख,राजाराम उप पोलीस स्टेशनची १ लाख ७५ हजार आणि वेंकटापुर उप पोलीस स्टेशनची ५९ हजार ८६० रुपयांचा असे एकूण ५७ लाख ३४ हजार ८६० रुपयांचा दारूसाठा समाविष्ट होता.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या उपस्थित करण्यात आला.तर यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक गणेश कुचेकर,अहेरीचे ठाणेदार स्वप्नील इज्जपवार, पेरमिलीचे प्रभारी अधिकारी दीपक सोनुने,राजारामचे प्रभारी अधिकारी सचिन चौधरी,वेंकटापुर चे पोलीस उप निरीक्षक राजू गड्डापोड तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.













