शिरूरमध्ये कंटेनर ट्रकच्या धडकेत तिघांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर
शिरूर प्रतिनिधी – रमेश बनसोडे
शिरूर, दि. 24: शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील न्हावरे येथे काल रात्री एका भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात तळेगाव ढमढेरे-न्हावरे रोडवर संदीप महादेव सरके यांच्या घराशेजारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कैलास कृष्णाजी गायकवाड (वय 49), त्यांची मुलगी गौरी कैलास गायकवाड (वय 20) आणि चुलत मेव्हणे गणेश महादेव नेर्लेकर (वय 23) हे वाघोलीहून न्हावरेकडे त्यांच्या स्विफ्ट कारमधून (एम.एच.16 सी. व्ही. 4176) येत होते. त्याचवेळी, न्हावरे बाजूकडून तळेगावच्या दिशेने जाणार्या कंटेनर ट्रकने (एन. एल. 05 जी 2396) त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.
या अपघातात कैलास गायकवाड, गौरी गायकवाड आणि गणेश नेर्लेकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर कैलास गायकवाड यांची पत्नी दुर्गा कैलास गायकवाड (वय 45) गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कंटेनर ट्रकचा चालक अपघात घडवून घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 106 (1) (2), 125 (अ), 125 (ब) 324 (4), 281 सह मोटार वाहन कायदा कलम 184, 134/177 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार पवार आणि पोलीस हवालदार भोते हे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.












