गडचांदूर │ राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या संकल्पनेतून आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तसेच भारतीय जनता पक्ष, गडचांदूर यांच्या वतीने स्व. भाऊराव पाटील चटप आश्रमशाळेत भव्य महाआरोग्य शिबीर संपन्न झाले. या शिबिराचा गडचांदूर आणि परिसरातील १५९० नागरिकांनी लाभ घेतला, तर ३९२ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आले.
शिबिरात नेत्ररोग, सर्जरी, बालरोग, स्त्रीरोग, दंतरोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग, त्वचारोग, मेडिसिन आणि कॅन्सर तज्ज्ञांनी रुग्णांची तपासणी केली. या तपासणीत ३९२ रुग्ण विविध शस्त्रक्रियेस पात्र ठरले असून, त्यांच्यावर आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) येथे टप्प्याटप्प्याने उपचार करण्यात येणार आहेत.
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आमदार देवराव भोंगळे म्हणाले, लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सेवेचा मंत्र दिला आहे. त्यांच्या प्रेरणेतूनच आम्ही सेवा केंद्राच्या माध्यमातून असे महाआरोग्य शिबिर आयोजित करत आलो आहोत.
ते पुढे म्हणाले, आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे. मात्र, धकाधकीच्या जीवनात अनेकजण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे वेळीच निदान होणे गरजेचे आहे. या शिबिराच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी आरोग्य तपासणी आणि उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भविष्यातही अशा शिबिरांचे आयोजन करून अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळवून देण्याचा आमचा मानस आहे.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, तालुकाध्यक्ष संजय मुसळे, तालुका महामंत्री सतिश उपलेंचवार, शहराध्यक्ष अरूण डोहे, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अरूण मडावी तसेच डॉ. हरीश घोरे, शंकर आपुरकर, प्रमोद कोडापे, महेश घरोटे, अरविंद एकरे, शिवाजीराव सेलोकर आणि शहराध्यक्षा शितल धोटे, अपर्णा उपलेंचवार, उमा कंठाळे, नमिता विश्वास, रंजना मडावी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.













