राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत पुणे व धाराशिवची बाजी; मुंबई उपनगर-सांगली उपविजेते
शिरूर प्रतिनिधी – रमेश बनसोडे
अहिल्यानगर येथे पार पडलेल्या हिरक महोत्सवी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुणे व धाराशिव संघांनी आपली अजिंक्यपदाची मोहोर उमटवली. पुण्याच्या पुरुष संघाने मुंबई उपनगरचा पराभव करत सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदावर नाव कोरले, तर महिला गटात धाराशिव संघाने सांगलीचा पराभव करत जेतेपद पटकावले.
धाराशिव महिलांचा रोमांचक विजय
महिला गटातील अंतिम सामन्यात धाराशिव संघाने सांगलीला 11-10 अशा एका डाव आणि एका गुणाने पराभूत केले. पहिल्या डावात सांगलीला केवळ 5 गुण मिळवता आले, तर धाराशिवने आक्रमक खेळी करत 11 गुणांची कमाई केली. मध्यंतरानंतर सांगलीला आघाडी पार करता आली नाही आणि शेवटी धाराशिवने विजय साजरा केला.
धाराशिव संघातर्फे संध्या सुरवसे (1.40 मिनिटे संरक्षण, 1 गुण), संपदा मोरे (1.20 मिनिटे संरक्षण, 2 गुण) आणि अश्विनी शिंदे (2.40 मिनिटे संरक्षण) यांनी उत्तम खेळ केला. सांगलीकडून ऋतिका मगदूम (1.30 मिनिटे संरक्षण, 5 गुण) आणि प्रतिक्षा बिराजदार (1.10 मिनिटे संरक्षण, 1 गुण) यांनी प्रभावी कामगिरी केली.
पुरुष गटात पुण्याचा विजय
पुरुष गटातील अंतिम सामन्यात पुणे संघाने दमदार खेळ करत मुंबई उपनगर संघाचा पराभव केला. पुणे संघाचा सुरेश गरगटे हा सामन्यातील प्रमुख आकर्षण ठरला.
शुभम व संध्या सर्वोत्तम खेळाडू
स्पर्धेतील सर्व पुरुष खेळाडूंना प्रत्येकी 10,000 रुपयांचे बक्षीस देण्यात आले. पुण्याच्या शुभम थोरातला “छत्रपती संभाजी राजे पुरस्कार”, तर धाराशिवच्या संध्या सुरवसेला “राणी अहिल्याबाई पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार यादी:
सर्वोत्कृष्ट खेळाडू: शुभम थोरात (पुणे), संध्या सुरवसे (धाराशिव)
उत्कृष्ट संरक्षक: अनिकेत चेंदवणकर (मुंबई उपनगर), अश्विनी शिंदे (धाराशिव)
उत्कृष्ट आक्रमक: सुरेश गरगटे (पुणे), सानिका चाफे (सांगली)
अनिकेत व साहिलच्या कामगिरीने पिंपरी दुमालाचा नावलौकिक
पिंपरी दुमाला गावातील अनिकेत आणि साहिल हे सख्खे भाऊ आता जिल्हा संघासोबत राज्य संघातही आपली छाप पाडत आहेत. त्यांच्या यशामुळे संपूर्ण गाव आनंदात असून, “पिंपरी दुमालाचे हे खेळाडू गावाचे नाव क्षितिजापलीकडे नेणार आहेत,” असे ग्रामस्थांनी अभिमानाने सांगितले













