मुल │ मौजा नवेगाव भुज शेतशिवार येथे जनावरांची अवैध वाहतूक करण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींविरुद्ध पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला. गोपनीय माहितीच्या आधारे १२ मार्च रोजी पोलीस ठाणे मुलच्या पथकाने छापा टाकून ११ जनावरांची सुटका केली.
सदर प्रकरणी चार आरोपी व एका विधीसंघर्ष बालकाविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ च्या कलम ५ (अ), प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० च्या कलम ११ (घ) (ड) आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४, २५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या कारवाईत एन्ट्रा वाहन (MH34-BZ-0623) आणि पिकअप वाहन (MH29-BE-2304) यामध्ये ११ गौवंश आढळून आले. ही जनावरे २,०५,०००/- रुपये किंमतीची असून दोन्ही वाहने मिळून ९,००,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपींकडून एक धारदार शस्त्र आणि मोबाईलही हस्तगत करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक दिनकर ठोसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मुल आणि प्रभारी ठाणेदार प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत सपोनि अमितकुमार आत्राम, पोहवा प्रशांत गायकवाड, पोहवा सुनील कुडमेथे, पोहवा भोजराज मुंडरे, पोअं. विशाल वाढई आणि चापोहवा प्रेम दासरवार यांनी सहभाग घेतला.













