शिरूर पोलिसांची मोठी कारवाई: ५० लाखांची अवैध दारू जप्त, ट्रकचालक अटकेत
शिरूर प्रतिनिधी – रमेश बनसोडे
शिरूर पोलिसांनी अवैध दारू तस्करीविरोधात मोठी कारवाई करत ५० लाख ८४ हजार ५१० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. या कारवाईत ट्रकचालकाला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० मार्च २०२४ रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, झाडगुंई भागात टाटा कंपनीचा ट्रक (MH 48 AT 3606) अवैधरीत्या दारू वाहतूक करत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ट्रक थांबवला आणि तपासणी केली असता, त्यामध्ये भारत पेट्रोलियम कंपनीचे सिलिंडर ठेवून त्याखाली गोवा बनावटीची मोठ्या प्रमाणावर अवैध दारू लपवण्यात आल्याचे आढळले.
ट्रकचालक मोहम्मद इस्माईल सलीम शेख (वय ३७, रा. उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून अधिक चौकशी केली जात आहे.अवैध दारूचे एकूण मूल्य: ₹५०,८४,५१०/-
ट्रकचे अंदाजे मूल्य: ₹१५,००,०००/-
एकूण जप्त मुद्देमाल: ₹६५,८४,५१०/-
पुढील तपास सुरू:
शिरूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, दारूचा स्रोत आणि या तस्करीच्या रॅकेटमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांची कामगिरी:
ही कारवाई पोलिस निरीक्षक मंगेश कडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शुभम चव्हाण, महिला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, पोलीस अंमलदार आप्पासाहेब कड, शेखर झाडगुंई, निजाम पिसाळ, हनिफ भाई, दिलीप शेलार आणि रवींद्र Aksh यांनी केली.
शिरूर पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, यापुढे अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.













