चिंचणी घोडधरणातून उन्हाळी आवर्तन; शेतकऱ्यांना दिलासा
शिरूर प्रतिनिधी -अल्लाउद्दीन अलवी
शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्याच्या शेतीसाठी वरदान असलेल्या चिंचणी घोडधरणातून उन्हाळी पाणी आवर्तन सोडण्यात आले आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवि बापू काळे, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे, सुधीर फराटे इनामदार, पिंपळसूटीचे माजी सरपंच नितीन फलके आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पाणी आवर्तनाची मागणी केली होती. यानंतर आमदार कटके यांनी घोड धरण अधिकारी वैभव काळे, शाखाधिकारी चंद्रकांत पातारे आणि स्थापत्य अभियंता सहाय्यक गौरव जांगडे यांना तातडीने आदेश दिले.
धरणावर पाणी पूजन करून साडी-चोळी अर्पण करण्याची पारंपरिक प्रथा आमदार कटके यांच्या पत्नी मनीषा ताई कटके यांच्या हस्ते पार पडली. या वेळी जलसंपदा विभागाचे अधिकारी, पदाधिकारी आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते.
या आवर्तनामुळे शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला मोठा फायदा होणार असून, शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. “धरणातून उन्हाळी आवर्तन सोडल्यामुळे शेतीला जीवनदान मिळाले आहे,” अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली. कार्यक्रमाचे आभार दादासाहेब पवार यांनी मानले.













