मुलचेरा:स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अंबेला येथे ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुलचेरा पोलिसांनी भव्य महिला मेळावा घेतला. या मेळाव्यात परिसरातील महिलांसोबतच गरीब व गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तू,शेतकऱ्यांना बी-बियाणे तसेच विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दलातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत.त्यातील ‘प्रोजेक्ट उडान’,पोलीस दादालोरा खिडकी’ हे पोलिसांचे अभिनव उपक्रम आहेत.या माध्यमातून नागरिकांना आरोग्य,कृषी,शिक्षण क्षेत्रात लाभ दिला जात आहे. शासनाच्या विविध विभागांसोबतच पोलीस विभाग देखील भव्य जनजागरण मेळावे,महिला मेळावे घेऊन शासकीय योजनांची जनजागृती करून त्याचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक निलोत्पल,अपर पोलीस अधीक्षक यातीश देशमुख (अभियान),अपर पोलीस अधीक्षक एम.रमेश (प्रशासन),अपर पोलीस अधीक्षक सत्यासाई कार्तिक यांच्या संकल्पनेतुन आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनात मुलचेरा पोलिसांनी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अंबेला येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन केले.पोलीस निरीक्षक महेश विधाते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महिला मेळाव्यात उपस्थित महिला व शेतकरी बांधवांची आरोग्य तपासणी,गरजूंना विविध दाखले वाटप,शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे औजारे,बी-बियाणे व जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले.यावेळी विविध विभागाकडून स्टॉल लावून योजनांची माहिती देऊन योग्य मार्गदर्शन देखील करण्यात आले.यावेळी पोलिस निरीक्षक महेश विधाते यांनी पोलिस दलातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देऊन लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

या महिला मेळाव्याचे उदघाटन प्र.तालुका कृषी अधिकारी एस.एच.सुतार यांच्याहस्ते करण्यात आला.यावेळी विविध विभागाचे अधिकारी,कर्मचारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी पोलीस उपनिरीक्षक दीपाली कांबळे,पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा खापे,अंमलदार आदींनी परिश्रम घेतला. तर गावकऱ्यांनी देखील मोलाचे सहकार्य केले.मेळाव्यात परिसरातील विविध गावातील महिलांसह शेकडो नागरिक उपस्थित होते.













