गोंडपिपरी (सुरज माडूरवार) )│ स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने गोंडपिपरी येथे मोठी कारवाई करत शीतपेटीच्या आड दारू तस्करीचा प्रयत्न उधळून लावला आहे. आज ७ मार्च रोजी दुपारी १२:३० वाजता वन डेपो परिसरात MH34 04 HY 0528 या आयशर ट्रकचा सिनेस्टाईल पाठलाग करून तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान ट्रकमध्ये शीतपेट्यांच्या आड लपवलेला ३०० पेटी देशी दारूचा साठा आढळून आला. पोलिसांनी सागर अशोक परदेशी (३८, रा. चाळीसगाव, जि. जळगाव) याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक तपासानुसार, सदर देशी दारूचा साठा नांदेडवरून ट्रकमध्ये भरला गेला होता, मात्र तो कोणत्या ठिकाणी पोहोचवायचा, याबाबत आरोपीला स्पष्ट माहिती नव्हती. फोनवरून टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन करून तस्करी करण्यात येत होती.
गोंडपिपरी तालुक्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला जोडलेली असल्याने येथून मोठ्या प्रमाणात दारू तस्करी होत आहे. ३ मार्च रोजीच गोंडपिपरी पोलिसांनी सुरगाव टोल नाक्याजवळ १३.१६ लाख रुपयांचा दारूसह मुद्देमाल जप्त केला होता. तरीही तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे.
या कारवाईत पीआय काचोरे, अपिआय झाडोकर, पीएसआय सामलवार, पीएसआय विनोद भुरले, पीएसआय निंभोरकर, ठाणेदार हत्तोगोटे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी सहभागी होते. पुढील तपास सुरू आहे.













