गडचिरोली:मागील काही महिन्यांपासून मुलचेरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू आहे.रेती तस्करीवर आळा घालण्यासाठी आता वनविकास महामंडळाने पुढाकार घेतला असून ७ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सौरभ गंजेवार यांनी आपल्या चमू सोबत जंगल परिसरात गस्त घालून तब्बल चार ट्रॅक्टर जप्त केली आहे.
वनविकास महामंडळ कार्यालय मुलचेरा अंतर्गत मुलचेरा,घोट, ठाकूरनगर आणि विक्री आगार असे चार उपक्षेत्र आहेत.यातील काही उपक्षेत्रातून मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैध रेती तस्करी केली जात आहे.येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सौरभ गंजेवार यांनी आपल्या चमुसोबत गस्त घालत असताना ठाकूरनगर उपक्षेत्रातील नरेंद्रपूर बिटात खंड क्रमांक ५४८ मध्ये मध्यरात्री काही ट्रॅक्टर द्वारे रेती तस्करी सुरू असल्याचे आढळताच त्यांनी रेती तस्करी करणारे तब्बल चार ट्रॅक्टर वर जप्तीची कारवाई केली.
जवळपास पहाटे ३ ते ४ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून घोट परिसरातील काही राजकीय व्यक्तींची ट्रॅक्टर असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.विशेष म्हणजे ट्रॅक्टर सोबतच काही रेती तस्करी करणाऱ्या लोकांना देखील वनविकास महामंडळाने ताब्यात घेतल्याने ट्रॅक्टर नेमके कुणाचे याचा उलघडा होणार आहे.त्यामुळे याभागात मागील काही महिन्यांपासून सर्रासपणे सुरू असलेल्या रेती तस्करीचा मास्टरमाइंड आता समोर येणार आहे.उशिरा का होईना परंतु वन विभाग आणि महसूल विभागाने न केलेली कारवाई आता वन विकास महामंडळाने करून दाखविलण्याने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.

मागील काही वर्षांपूर्वी वन विकास महामंडळाचे तत्कालीन विभागीय व्यवस्थापक कुशाग्र पाठक यांनी स्वतः गस्त घालत अशीच कारवाई केली होती.त्यानंतर रेतीने भरलेले ट्रॅक्टर जप्त करून सदर प्रकरण महसूल विभागाकडे कारवाईसाठी दिली होती.मात्र त्या प्रकरणात नेमकं काय झालं याचा थांगपत्ता सुद्धा लागला नाही.नुकतेच काही दिवसांपूर्वी मुलचेरा पोलिसांनी देखील जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत दोन ट्रॅक्टर वर कारवाई केली.आता परत वन विकास महामंडळाने ही कारवाई केली आहे.त्यामुळे महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे हे विशेष.
———————————————————–
आपल्या चमुसोबत गस्त घालत असताना ठाकूरनगर उपक्षेत्रातील खंड क्रमांक ५४८ मध्ये अवैध रेती तस्करी सुरू असल्याचे आढळताच चार ट्रॅक्टर जप्त केले आहे. काही लोकांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे.
-सौरभ गंजेवार
वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपरिक्षेत्र कार्यालय मुलचेरा(एफडीसीएम)













