टोल प्लाझा ॲम्बुलन्स मुळे वाचले नवजात बालक व आईचे प्राण
दौंड प्रतिनिधी – योगेश राऊत
सरडेवाडी टोल प्लाझाच्या ॲम्बुलन्स सेवेने आज पुन्हा एकदा आपत्कालीन परिस्थितीत वेगवान मदत करत एका गरोदर महिलेचा आणि नवजात अर्भकाचा जीव वाचवला.
आज दिनांक 06 मार्च 2025, सकाळी 8:55 वाजता, टोल प्लाझा सरडेवाडी येथे भ्रमणध्वनीवर संदेश आला की, पुणे-सोलापूर महामार्गावर महादेव मंदिर, सरडेवाडी येथे एका महिलेवर प्रसूतीच्या वेदनांनी अत्यंत गंभीर परिस्थिती ओढवली आहे. महिलेला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी तातडीने मदतीची आवश्यकता असल्याने टोल प्लाझा प्रशासनाने त्वरित ॲम्बुलन्स पाठवली.
सदर माहिती मिळताच टोल प्लाझा सरडेवाडी येथील ॲम्बुलन्स चालक संदिपान सलगर आणि वैद्यकीय सहाय्यक सचिन चव्हाण तात्काळ घटनास्थळी पोहोचले. तिथे हतरी पंकज चौहान (वय 15, रा. मध्य प्रदेश) ही महिला रस्त्यावर प्रसूतीच्या असह्य वेदनांनी तळमळत होती. कर्मचाऱ्यांनी तत्काळ तिला ॲम्बुलन्समध्ये हलवले आणि रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाले.
मात्र, मार्गातच महिलेची प्रसूती सुरू झाली आणि नवजात अर्भकाचे डोके बाहेर आले. अशा अत्यंत नाजूक परिस्थितीत वैद्यकीय सहाय्यक सचिन चव्हाण आणि महिलेच्या नातेवाईकांच्या मदतीने ॲम्बुलन्समध्येच सुरक्षित प्रसूती करण्यात आली. त्यानंतर आई आणि नवजात अर्भकाला सुरक्षितपणे उपजिल्हा रुग्णालय, इंदापूर येथे दाखल करण्यात आले.
या तात्काळ आणि जबाबदारीच्या कामगिरीबद्दल टोल प्लाझाचे वरिष्ठ अधिकारी फनी कुमार मुल्ला, सतीश चव्हाण, रमण सर, ओंकार पनारी आणि नितीन शिंदे यांनी ॲम्बुलन्स चालक संदिपान सलगर व वैद्यकीय सहाय्यक सचिन चव्हाण यांच्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले.
टोल प्लाझाच्या या तत्पर सेवेने आणखी एक जीव वाचवला असून, आपत्कालीन परिस्थितीत टोल प्लाझा प्रशासन कशा प्रकारे महत्त्वाची भूमिका बजावते, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.













