बाभुळसर बु. येथे उदनशाबाबा यात्रेचा आजपासून शुभारंभ
शिरूर प्रतिनिधी – अल्लाउद्दीन अलवी
बाभुळसर बु. (ता. शिरूर, जि. पुणे), ता. ६:
गावातील श्रद्धास्थान असलेल्या उदनशाबाबा यात्रेचा उत्सव आजपासून मोठ्या भक्तिभावाने सुरू होत आहे. यात्रेच्या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार, दि. ६ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता उदनशाबाबा मंदिरात संदल कार्यक्रम होणार आहे. यावेळी बाबांच्या कबरीला संदल अर्पण करण्यात येईल. यानंतर गावचे पुजारी शहानूर भाई सय्यद व कासमभाई सय्यद यांच्या उपस्थितीत गल्लप व शेरा चढवला जाईल. तसेच फातिहा आणि सामूहिक पूजा होईल. यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवार, दि. ७ मार्च रोजी दिवसभर पिरसाहेब, देवाचे माळ येथे शेरण्याचा कार्यक्रम पार पडेल. याच दिवशी रात्री १० ते २ या वेळेत प्रसिद्ध शाहीर साहेबराव नांदवळकर यांच्या लोकनाट्य तमाशाचा रंगारंग कार्यक्रम ग्रामस्थ व पाहुण्यांसाठी आयोजित केला आहे.
शनिवार, दि. ८ मार्च रोजी सकाळी ९ ते १२ हजऱ्या कार्यक्रम पार पडेल. संध्याकाळी ४ वाजता जंगी कुस्त्यांचा आखाडा रंगणार आहे. तसेच रात्री ९ ते १२ वाजता पुन्हा एकदा साहेबराव नांदवळकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम होईल.
गावच्या आधारवड कै. संपतराव आबा नागवडे यांना या यात्रेच्या निमित्ताने श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. संपूर्ण यात्रेच्या नियोजनाची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावात भक्तिमय वातावरण तयार झाले असून, श्रद्धाळू व भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा आहे.













