बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव करून पुतण्यानेच केला शेतकरी महिलेचा खून
दौंड, प्रतिनिधी – योगेश राऊत
दौंड तालुक्यातील कडेठाण येथे शेतात काम करणाऱ्या लता बबन धावडे (५०) यांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याचा दावा प्रथम करण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या सखोल तपासात हा अपघात नसून खून असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली असून, मृत महिलेचा पुतण्या उपसरपंच अनिल पोपट धावडे (४०, रा. कडेठाण) आणि त्याचा साथीदार सतिलाल वाल्मीक मोरे (३०, रा. तिकी, ता. चाळीसगाव, सध्या कडेठाण) अशी आरोपींची नावे आहेत.
७ डिसेंबर २०२४ रोजी कडेठाण येथे शेतात लता धावडे या पाठीवर झोपलेल्या अवस्थेत आढळल्या होत्या. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता आणि रक्तस्राव झाल्याचे दिसून आले. स्थानिकांनी हा प्रकार बिबट्याच्या हल्ल्यामुळे घडल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी सखोल तपास केला असता काही संशयास्पद बाबी समोर आल्या.
शवविच्छेदन अहवालात त्यांच्या मृत्यूचे कारण गंभीर मार लागल्यामुळे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी नागपूर येथील प्रादेशिक न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत नमुने पाठविण्यात आले. अहवालात वन्यप्राण्याच्या हल्ल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक गतीमान केला आणि अखेर सत्य समोर आले.
खुनामागचे कारण आणि कट
पोलिस तपासात उघड झाले की, आरोपी अनिल धावडे आणि सतिलाल मोरे यांनी अनैतिक संबंधांमुळे वाद झाल्याने लता धावडे यांचा खून करण्याचा कट रचला. त्यांनी संगनमत करून त्यांच्या डोक्यावर दगडाने हल्ला करून त्यांचा निर्घृण खून केला. त्यानंतर हा प्रकार बिबट्याच्या हल्ल्याचा असल्याचे भासवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी फिर्याद दाखल केली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.एच. संपांगे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी बापुराव दडस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.













