हॉजीकॉन कॅफे मध्ये तलवारीचा धाक: व्यवसायिकाला जीवे मारण्याची धमकी
शिरूर प्रतिनिधी – रमेश बनसोडे
शिरूर तालुक्यातील बाबुरावनगर येथे असलेल्या हॉजीकॉन कॅरम कॅफेमध्ये एका इसमाने तलवारीचा धाक दाखवत दहशत माजवली. हा प्रकार दिनांक 03 मार्च 2025 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडला.
याप्रकरणी फिर्यादी आरबाज रहीम शेख (वय 23, व्यवसाय – स्कप सेंटर, रा. सय्यद बाबा नगर, शिरूर, जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी आपल्या मित्रांसह हॉजीकॉन कॅरम कॅफे येथे उपस्थित असताना नारायण गव्हाणे (रा. कुकडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) व त्याचा साथीदार बंटी घोडे (रा. गुजरमळा, शिरूर) हे मारुती सिलेरो कार मधून कॅफेमध्ये आले. नारायण गव्हाणे याने हातात तलवार घेऊन फिर्यादीला धमकावत “तु मला ओळखत नाही का? इथला धंदा करायचा असेल तर माझी परवानगी घ्यावी लागेल, नाही तर धंदा करायचा नाही!” असे म्हणत शिवीगाळ केली.
यानंतर त्याने हातातील तलवारीने फिर्यादीच्या अंगावर वार करण्याचा प्रयत्न केला तसेच कॅफेतील टेबल-खुर्च्या अस्ताव्यस्त फेकून दिल्या. त्याने कॅफेच्या बाहेर येऊनही तलवार फिरवत दहशत निर्माण केली, ज्यामुळे आसपासच्या लोकांनी घाबरून दुकाने बंद केली आणि पळापळ झाली.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्र. 151/2025 अंतर्गत भादंवि कलम 352, 351(2)(3), 4, 25 सह फौजदारी सुधारणा कायदा 2013 चे कलम 3, 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार जगताप (ब. नं. 25) करत असून, गुन्हा दाखल करणारे अधिकारी पोलीस हवालदार वारे (ब. नं. 850) आहेत. पुढील तपास सुरू असून आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.













